भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर देशभरात प्रचाराची राळ उडवून देणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाटणा येथे विराट सभा घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर तोफ डागली. नितीशकुमार हे संधिसाधू व विश्वासघातकी असून पंतप्रधान होण्याची घाई झाल्याने त्यांनी राममनोहर लोहिया यांच्या तत्त्वांना तिलांजली दिली आहे, असा घणाघाती आरोप मोदी यांनी केला. येथील गांधी मैदानामध्ये झालेल्या या सभेत मोदी यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी एकापाठोपाठ एक झालेल्या सहा स्फोटांमुळे प्रचंड खळबळ उडाली. या स्फोटांत पाच जण मृत्युमुखी, तर ६६ जण जखमी झाले. मोदी यांनी त्यांच्या भाषणात या स्फोटांचा उल्लेख केला नाही, मात्र सभा संपल्यानंतर सुरक्षितपणे घरी जा, अशी सूचना त्यांनी उपस्थितांना केली. ४० मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवरही टीका केली.
पंतप्रधानपदासाठी मोदी यांचे नाव भाजपने जाहीर केल्यानंतर जूनमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संयुक्त जनता दलाची भाजपशी असलेली आघाडी संपुष्टात आणली होती. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी मोदी यांना बिहारमध्ये प्रचारास येण्यापासून रोखले होते. या हुंकार सभेला ही पाश्र्वभूमी असल्याने मोदी यांनी प्रामुख्याने नितीशकुमार यांनाच लक्ष्य केले. बिहारी जनतेच्या भावनांना हात घालण्यासाठी भाषणाची सुरुवात त्यांनी भोजपुरी भाषेतून केली. मोदी म्हणाले, ‘बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मी नेहमीच मित्र असा करीत असल्याने तुमच्या मित्राने बिहारमध्ये भाजपला सोडचिठ्ठी का दिली, असा प्रश्न काही जण विचारतात, त्यांना मी सांगू इच्छितो की, ज्या व्यक्तीने राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या तत्त्वांना सोडले तो भाजपला सहज सोडू शकतो. लोहिया आणि जयप्रकाश यांनी आयुष्यभर काँग्रेसशी संघर्ष केला व देशातून काँग्रेसचे उच्चाटन व्हावे, यासाठी लढा दिला. बिहारचे मुख्यमंत्री स्वत:ला या दोघांचे अनुयायी समजतात, मात्र आज तेच पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेससोबत लपंडाव खेळत आहेत. संधिसाधूपणाचे हे राजकारण करून त्यांनी लोहियांच्या पाठीत खंजीरच खुपसला आहे. या गुन्ह्य़ासाठी लोहिया व जयप्रकाश यांचे आत्मे त्यांना कधीही माफ करणार नाहीत.
गेल्या निवडणूक प्रचारादरम्यानच्या  वादाचाही त्यांनी उल्लेख केला. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी मला प्रचार करण्यासाठी येथे येऊ दिले नाही, मात्र बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येऊ नये, यासाठी मी तो अपमान गिळला. बिहारमध्ये भाजपने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली, मात्र संधिसाधू मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केला, असे ते म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, निधर्मीवादाच्या नावाखाली काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करत आहे. हिंदू आणि मुस्लीम कोणालाही परस्परांशी संघर्ष नको आह़े  काँग्रेस मात्र गरिबी उच्चाटनाऐवजी हिंदू व मुस्लिमांना आपापसांत लढवत आहे. मोदी यांच्या भाषणापूर्वी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह, राजीव प्रताप रुडी, शहानवाझ हुसेन आदींची भाषणे झाली.
‘प्रीती’भोजनात चुळबुळ
पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांसोबत भोजन करण्यासाठी मी व नितीशकुमार एकाच टेबलवर आलो. त्या वेळी नितीश यांची चुळबुळ सुरू झाली व ते इकडेतिकडे पाहू लागले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली व मी त्यांना म्हटले, काही काळजी करू नका, येथे कॅमेरे नाही आहेत. नितीश यांच्या ढोंगीपणाची ती परिसीमा होती, असे मोदी म्हणाले.
लोकशाहीचे शत्रू
जातिभेद, धर्माध राजकारण, घराणेशाही आणि संधिसाधूपणा हे आपल्या लोकशाहीचे शत्रू असून दुर्दैवाने बिहार व केंद्र सरकारला या चार शत्रूंनी घेरले आहे, त्यामुळे बिहार व केंद्र सरकारमध्ये सत्तेत परिवर्तन होणे आवश्यक आहे. या सत्ताधाऱ्यांना उखडून फेकून द्या. ब्रिटिशांना हाकलून द्या, असा नारा महात्मा गांधी यांनी दिला होता. आपण काँग्रेसला हद्दपार करण्याचा संकल्प सोडू, असे मोदी म्हणाले.