दिल्लीतील शेतकरी आत्महत्येमध्ये जो कोणी दोषी असेल, त्याला फाशी द्या पण या विषयावरून राजकारण करू नका, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केली.
केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण विधेयकाविरोधात आम आदमी पक्षाने बुधवारी दिल्लीमध्ये शेतकरी सभा आयोजित केली होती. या सभेवेळी राजस्थानमधील एका शेतकऱयाने सभेच्या ठिकाणी असलेल्या एका झाडाला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली. गजेंद्र सिंह असे या शेतकऱयाचे नाव आहे. या आत्महत्येवरून गेल्या दोन दिवसांपासून राजकीय पक्षांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. केजरीवाल यांनी याबाबत दोन दिवस मौन बाळगले होते. शुक्रवारी पहिल्यांदाच वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली.
ते म्हणाले, आमची सभा चालू असताना व्यासपीठापासून दूर एका झाडावर काहीतरी चालले असल्याचे आम्हाला कळले. त्या झाडापुढे बॅनर होते. त्यामुळे तिथे नक्की काय चालले आहे, ते कळत नव्हते. काहीवेळाने तिथे कोणीतरी आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचे आम्हाला समजले. पण तेही कन्फर्म होत नव्हते. त्यामुळे आम्ही काही घोषणाही करू शकत नव्हतो. त्यातही आम्ही काही घोषणा केली असती, तर सभेमध्ये गोंधळ निर्माण झाला असता. त्यामुळे आम्ही कोणतीही घोषणा केली नाही.
आत्महत्येचा प्रयत्न सुरू असताना आम्ही सभा सुरू ठेवली, ही आमची चूक झाली असे कोणाला वाटत असेल तर मी माफी मागतो. या प्रकरणाचा तपास आता पोलीस करीत आहेत. मी स्वतः पोलीसांना संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. त्यांनी मला चौकशीसाठी बोलावल्यास मी जाण्यास तयार आहे. जे कोणी यामध्ये दोषी आहेत, त्यांना फाशी द्या. पण या विषयावरून गेल्या दोन दिवसांपासून जे राजकारण सुरू आहे, ते ठिक नाही, असे त्यांनी म्हटले आहे.