पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर भाजपने तोफ डागली आहे. क्रिकेटमधून राजकारणात आलेल्या सिद्धूंच्या दलबदलूपणामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही. त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, असे भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

तत्कालीन भारतीय जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या बलराज मधोक यांनीही भाजप सोडले होते. त्यावेळीही पक्षावर कोणताही परिणाम झाला नाही. मधोक यांच्यासमोर तर नवज्योतसिंग सिद्धू यांची राजकीय उंची खूपच तोकडी आहे, असेही कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. सिद्धू क्रिकेटर होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना राजकीय ओळख मिळाली. भाजपमुळेच ते राजकीय नेते बनले. म्हणूनच सिद्धूंसारख्या लोकांच्या येण्या-जाण्याने पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपला काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी कैलाश विजयवर्गीय यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. उत्तराखंडमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी आपला फाटलेला कुर्ता उपस्थितांना दाखवला होता. त्यावरून विजयवर्गीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. वास्तव आणि नाटकीपणात खूपच मोठा फरक आहे. राहुल गांधी नाटकी आहेत. फाटलेला कुर्ता दाखवून कुणी गरीब होत नाही. फाटलेला कुर्ता परिधान केलेली व्यक्ती सुट्टी घालवण्यासाठी परदेशात कसा जाऊ शकतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नोटाबंदीच्या निर्णयाला सर्वाधिक फायदा गरिबांना झाला असल्याचा दावाही विजयवर्गीय यांनी यावेळी केला.

दरम्यान, सिद्धूंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिरोमणी अकाली दलावर टीका केली होती. त्यानंतर बादल कुटुंबीयांनीही त्यांच्यावर शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. शिरोमणी अकाली दलाने पंजाबला कुठे-कुठे विकले आहे, याचा भंडाफोड करणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. सिद्धूंच्या या टीकेला शिरोमणी अकाली दलानेही चोख प्रत्युत्तर दिले होते. हे दलबदलू आहेत, जे सौदे करतात, त्यांना जनता ओळखत नाही का?, असा सवाल शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख व मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केला होता. हे स्थलांतरित करणारे पक्षी आहेत. ते कोणासाठी काम करतात हे जनतेला चांगलेच ठाऊक असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर आज, शुक्रवारी सिद्धू यांनीही शिरोमणी अकाली दल आणि बादल कुटुंबीयांवर जोरदार हल्ला चढवला आहे. आपले इमले बांधण्यासाठी बादल कुटुंबीयांनी पंजाब कसा विकायला काढला आहे, याचा भंडाफोड करणार असल्याचे सिद्धू यांनी चंदीगडमधील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.