पंजाबमध्ये आता महामार्गापासून ५०० मीटरच्या आतही मद्य मिळणार आहे. पंजाब विधानसभेत आज कॅबिनेटच्या निर्णयाला संमती देण्यात आली असून पंजाब उत्पादन शूल्क अधिनयमात दुरूस्ती करून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या हॉटेल, रेस्तराँ आणि क्लबमध्ये मद्य मिळण्यास परवानगी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत मद्य विक्रीवर बंदी घातली होती.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या कॅबिनेटने मागील शनिवारी नवीन उत्पादन शूल्क पॉलिसीला मंजुरी दिली होती. सरकारच्या नव्या नितीनुसार राष्ट्रीय आणि राज्य मार्गापासून ५०० मीटरच्या आत मद्य विक्रीवर बंदी असेल. पण ही बंदी हॉटेल, रेस्तराँ आणि क्लबला लागू होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील मद्य दुकानांवर बंदी असेल. या बंदीतून रेस्तराँ, हॉटेल आणि क्लबला सूट देण्यात आल्याची माहिती अमरिंदर सिंग यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंजाब उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम २६ अ मध्ये सुधारणा करण्यास हिरवा कंदिल दाखविण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंजाब आणि इतर राज्यातील महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पंजाब सरकारने हा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वाढत्या अपघातांमुळे महामार्गावर दारू विक्री करण्यास बंदी घातली आहे.