‘शौर्य चक्र’ पुरस्काराने सन्मानित मानवाधिकार कार्यकर्ते बलविंदर सिंह यांची शुक्रवारी पंजाबच्या तरनतारन येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही अज्ञात लोकांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये थैमान घातल्याच्या काळात त्यांनी २०० दहशतवाद्यांना ‘सळो की पळो’ करुन सोडलं होतं. त्यांच्यावर ४२ वेळा दहशतवाद्यांनी हल्लाही केला होता, त्यामुळे त्यांना कुटुंबीयांसहित ‘शौर्य चक्र’ने सन्मानित करण्यात आलं होतं.

बलविंदर सिंह भिखीविंडमध्ये राहत होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजता ते आपल्या घऱातच होते. तेव्हा अचानक काही अज्ञात लोकांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. बलविंदर यांच्या कुटुंबीयांनी यामागे दहशतवाद्यांच्या हात असल्याची शंका वर्तवली आहे.

पंजाब सरकारने काही काळापूर्वीच त्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. सरकारच्या या निर्णयाचा त्यांनी विरोध देखील केला होता. यापूर्वीही बलविंदर यांच्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत. सन २०१७ मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर गोळीबार केला होता. यातून त्याचं कुटुंब बचावलं होतं.

‘शौर्य चक्र’ने करण्यात आलं होतं सन्मानीत

पंजाबमध्ये जेव्हा खलिस्तानवादी दहशतवाद उच्च पातळीवर पोहोचला होता. त्यावेळी बलविंदर सिंह यांच्यावर ४२ वेळा हँड ग्रेनेड आणि रॉकेट लॉन्चरने हल्ले झाले. त्यांनी प्रत्येकवेळी दहशतवाद्यांचा सामना केला होता. त्यांनी अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान देखील घातले. बलविंदर सिंह यांना सन १९९३ मध्ये राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी शौर्य चक्रने सन्मानित केलं होतं. त्यांच्यासोबत पत्नी जगदीप कौर, भाऊ रणजीत सिंह आणि भूपिंदर सिंह यांना देखील शौर्य चक्रने सन्मानित करण्यात आलं होतं. बलविंदर आपल्या घराजवळ शाळा चालवत होते. त्यांच्या जीवनावर टीव्हीवर अनेक मालिकाही तयार झाल्या आहेत.