केंद्र सरकारने लागू केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटबंदीमुळे एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी लावलेल्या लांबच लांब रांगा पाहिला मिळत आहेत. देशभर हेच चित्र दिसत आहे. लांब रांगा आणि पैशांच्या कमतरतेमुळे नागरिक अगोदरपासूनच त्रस्त असतानाच पंजाबमधील एका बँकेच्या एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी देण्यात आलेले जवळजवळ सात लाख रुपये घेऊन बँकेचा सहाय्यक व्यवस्थापक फरार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मोहाली जिल्ह्यातील डेराबस्सी येथील बंकरपूर गावातील ही घटना असल्याचे इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी नोटबंदीचा निर्णय जाहिर केल्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबरला पंजाब आणि सिंध बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक तेज प्रताप सिंग भाटिया यास ६.९८ लाख रुपये बँकेच्या एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी देण्यात आले होते. बंकरपूर गावातील एटीएम मशीनमध्ये हे पैसे भरायचे होते. परंतु तेज प्रताप पैसे घेऊन फरार झाल्याचे समजते.

बँकेचा इंजिनियर आणि सुरक्षारक्षकाला एटीएमच्या ठिकाणी पोहचून अंबाला येथे राहाणाऱ्या तेज प्रतापच्या देखरेखीखाली एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे आदेश देण्यात आले होते, अशी माहिती डेराबस्सी पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक दीपेंद्र सिंग यांनी दिली. आपल्या गाडीतून एटीएमच्या ठिकाणी पोहचत असल्याचे सांगत तेज प्रतापने इंजिनियर आणि सुरक्षारक्षकाला गुंगारा दिल्याचे पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. एटीएमच्या ठिकाणी पोहचलेले कर्मचारी खूप वेळ वाट पाहात उभे राहिले, परंतु तेज प्रताप आलाच नाही. त्यांनी तेज प्रतापला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद येत होता. बँकेच्या व्यवस्थापकानेदेखील तेज प्रतापला संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० नोव्हेंबरपर्यंत वाट पाहिल्यानंतर बँक व्यवस्थापकाने डेराबस्सी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. पोलीसांनी तपास सुरू केला असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल, असे आश्वासन पोलीस निरिक्षक दीपेंद्र सिंग यांनी दिले.

एटीएम आणि बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा –

नोटबंदीच्या निर्णयानंतर एटीएम आणि बँकांच्या बाहेर लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहेत. मंगळवारी बँका आणि एटीएम उघडण्यापूर्वीच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केली होती. जनतेला कशाप्रकारे त्रास सहन करावा लागत आहे ते येथे देण्यात आलेल्या टि्वटरवरील संदेशाच्यामाध्यमातून समजू शकेल.