देशाच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या स्थलांतरितांची सुटका करुन, त्यांना पुन्हा आपल्या राज्यामध्ये नेणे इतके सोपे नाही. त्यामध्ये काय अडचणी, धोके आहेत ते पंजाबच्या निमित्ताने समोर आले आहे. तिथे करोना रुग्णांची संख्या वाढताच  पंजाबने ठाकरे सरकारला जबाबदार धरले आहे.

महाराष्ट्रातील नांदेडमधून पंजाबला परतलेल्या काही यात्रेकरुंचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे यात्रेकरुन नांदेडमधील तख्त हजूर साहिब गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आले होते. लॉकडाउनमुळे हे यात्रेकरुन गेल्या ४० दिवसांपासून नांदेडमध्येच अडकले होते. या यात्रेकरुंचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे महाराष्ट्राचीही चिंता वाढली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

प्रशासनाने तख्त हजूर साहिब गुरुद्वाराच्या आसपासाचा परिसर पूर्णपणे बंद केला आहे. ‘गुरुद्वाराच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांची तपासणी सुरु केली आहे. शनिवारपर्यंत त्यांचे रिपोर्ट येतील’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान महाराष्ट्रातून परतलेले यात्रेकरु करोना पॉझिटिव्ह निघाल्याने आता महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये शाब्दीक वादावादीला सुरुवात झाली आहे.

प्रवासाला सुरुवात होण्याआधी यात्रेकरुंची फक्त तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने करोना चाचणी केली नाही म्हणून पंजाब सरकार नाराज आहे. पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी पत्र लिहून आपली नाराजी महाराष्ट्र सरकारला कळवली आहे. ४० दिवसांपासून पंजाबमधील नागरिक नांदेडमध्ये अडकले होते. पण त्यांची साधी तपासणी केली नाही म्हणून पत्रातून निषेध नोंदवला आहे.

“आम्हाला त्यांनी सांगितले असते, तर आम्ही आमची टीम तिथे पाठवून करोना चाचणी केली असती. नागरिक कुठल्याही राज्याचा असला तरी आम्ही तपासणी करत आहोत” असे सिद्धू यांनी पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने पंजाबचा आरोप फेटाळून लावला आहे. “पंजाबमध्ये पाठवण्याआधी प्रत्येक यात्रेकरुची तपासणी करण्यात आली होती. त्यांच्यात करोनाची कुठलीही लक्षणे दिसली नव्हती. पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर ते पॉझिटिव्ह ठरले. महाराष्ट्र ते पंजाब प्रवासा दरम्यान त्यांच्या गाडया मध्य प्रदेशातील हॉटस्पॉट असलेल्या इंदूर, खारगाव या भागांमधून गेल्या” असे अधिकाऱ्याने सांगितले. लॉकडाउनमुळे ४ हजार यात्रेकरुन नांदेडमध्ये अडकले होते.