पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. या सर्व  गोंधळात आता पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय संध्याकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत माहिती मिळताच अमरिंदर सिंग यांनी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि खासदार मनीष तिवारी यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी आधी जर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले गेले तर ते पक्षही सोडतील असेही सांगितले होते.

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेले गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सर्व प्रयत्न करूनही अमरिंदर सिंग आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. शनिवारी होणाऱ्या आमदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याबाबत सोनिया गांधीकडे भाष्य केलं आहे. “अशा अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत,” असे अमरिंदर सिंग यांनी म्हटल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर पंजाब काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्वाच्या बदलाची चर्चा चंदिगढमधील आमदारांच्या बैठकीत तीव्र झाली आहे. अमरिंदर सिंग यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना सांगितले आहे, “असा अपमान पुरेसा आहे,हे तिसऱ्यांदा होत आहे. मी अशा अपमानाने पक्षात राहू शकत नाही.”

गेल्या काही महिन्यांत नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या आमदारांच्या एका गटाने अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले असून नव्या नेत्याची मागणी केली आहे. सुनील जाखड़, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रताप सिंह बाजवा आणि बेअंत सिंह यांचे नातू आणि खासदार रवनीत सिंह बिट्टू अशी नावे पंजाबच्या संभाव्य नवीन मुख्यमंत्र्यासाठी लढत आहेत.

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळा दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) शनिवारी राज्याच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस आणि पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी शुक्रवारी रात्री ही घोषणा केली होती. मात्र आता त्याआधीच अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याबाबत माहिती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे.