पंजाबमधील चणकोईया खुर्द या गावातील प्रेमी युगूलाने पळून जाऊन लग्न केल्यानंतर गावाने थेट प्रेमविवाहावर बंदी घालणारा ठरावच मंजूर केला आहे. ठरावाचे उल्लंघ करुन प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्यावर तसेच त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या नातेवाईकांवर बहिष्कार टाकला जाईल, अशी धमकीच ठरावाद्वारे देण्यात आली आहे. या ठरावावरुन आता वाद निर्माण झाला आहे.

चणकोईया खुर्द गावात राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या तरुणीशी पळून जाऊन लग्न केले. सुरुवातीला मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र, काही दिवसांनी त्या दोघांनी लुधियानात लग्न केल्याचे उघड झाले. यानंतर गावाने प्रेमविवाहावरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला. २९ एप्रिलला गावातील पंचायतीमध्ये ठराव मांडण्यात आला. गावातील गुरुद्वारा समिती आणि स्पोर्ट्स क्लबनेही या ठरावाला अनुमोदन दिले. या ठरावानुसार प्रेमविवाहावर बंदी असेल. एखाद्या तरुण- तरुणीने प्रेमविवाह केला तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल. गावातील दुकानदारांनी त्यांना कोणत्याही वस्तू विकू नये, असे ठरावात म्हटले आहे. तसेच अशा प्रेमीयुगूलांना ग्रामपंचायत तसेच गुरुद्वाराने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा लाभही घेता येणार नाही, असे ठरावात म्हटले आहे. या ठरावासंदर्भातील पत्रक गावातील बस थांबा आणि रस्त्यालगतच्या भिंतीवरही लावण्यात आले आहे.

गावातील सरपंच हकम सिंग यांनी या ठरावाचे समर्थन केले. ते म्हणाले, हा फतवा नाही, हा गावाने एकमताने घेतलेला निर्णय आहे. मुलीचे आजोबा आणि कुटुंबीयांनीच असा ठराव मांडण्याची मागणी केली होती. ठराव मंजूर केला नाही तर आत्मदहन करु असा इशारा त्यांनी दिला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

कायदेतज्ज्ञांनी मात्र या ठरावाची अंमलबजावणी करता येणार नाही, असे सांगितले. तर संविधानातील मूलभूत अधिकारांचे हे उल्लंघन आहे, असे सामाजिक संघटनांनी म्हटले आहे. या ठरावाचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.