पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवजोत सिंह सिद्धू यांची वर्णी लागल्यानंतर काँग्रेसमधील वाद शमल्याचं चित्र होतं. आता नवजोत सिंह सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंह माली यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. त्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी नवजोत सिंह सिद्धू यांच्या सल्लागारांवर निशाणा साधला आहे. नवजोत सिंह सिद्धू यांच्या सल्लागारांनी काश्मीर आणि पाकिस्तान मुद्द्यावर बोलणं देशासाठी धोकादायक ठरू शकतं असा सज्जड दम त्यांनी भरला आहे. त्यामुळे सल्लागारांनी या विषयावर भाष्य करू नये असा सल्ला त्यांनी दिला आहे.

“कोणतीही माहिती नसताना एखाद्या मुद्द्यावर बोलू नका. सल्लागारांना त्यांच्या म्हणण्याचा काय परिणा होतो हे माहिती नसतं”, असं सांगत नवजोत सिंह सिद्धू यांची कानउघाडणी केली. तसेच सल्लागारांना समज देण्यास सांगितलं आहे.

“काश्मीर हा काश्मिरी लोकांचा देश आहे. १९४७ मध्ये ब्रिटिशांनी भारत सोडत केलेल्या कराराचा आणि यूएनओच्या निर्णयाचं उल्लंघन करत काश्मीरचे दोन तुकडे केले. यावर पाकिस्तान आणि भारताने ताबा मिळवला”, असं वादग्रस्त विधान मालविंदर सिंह माली यांनी केलं होतं. माली यांच्या विधानानंतर विरोधकांनी काँग्रेसवर टीकेचे बाण सोडले आहेत. दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री यांनी पुढे येत नवजोत सिंह सिद्धू यांच्या सल्लागारांना खडे बोल सुनावले आहेत.

Corona: “पुढच्या महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा”; निती आयोगाच्या सूचना

यापूर्वीही माली यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर राज्यात जातीय तणाव पसरवत असल्याचा आरोप केला होता. पंजाबच्या राजकारणात माली यांची गणना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे कट्टर विरोधक म्हणून केली जाते.