काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजबाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमरिंदर सिंग यांनी आपल्याला अपमानित झाल्यासारखं वाटत आहे अशी भावना व्यक्त केली आहे. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेदांचा एक अध्याय संपला असला तरी येत्या चार महिन्यात तिथे निवडणुका होणार असल्याने पक्षासाठी अनिश्चिततेचा नवा अध्याय सुरु झाल्याची चर्चा आहे. दरम्यान काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे याकडे लक्ष लागलं आहे. यादरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि गांधी कुटुंबाच्या निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबिना सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली असल्याचं वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

अंबिका सोनी यांनी शनिवारी रात्री राहुल गांधी आणि सोनिया गांधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपलं पंजाबशी घट्ट नातं असून एका शीख व्यक्तीलाच राज्याचं प्रमुख बनवलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवज्योतसिंग सिद्धू यांनीही त्यांना समजावण्यासाठी बोलावलं होतं, पण  आपल्याला खात्री नाही अशी गोष्ट स्वीकारणार नाही असं त्यांनी सांगितलं.

इंदिरा गांधींनी अंबिका सोनी यांना १९६९ मध्ये पक्षात आणलं होतं. फाळणी झाली तेव्हा अंबिका सोनी यांचे वडील अमृतसरमध्ये जिल्हाधिकारी होते. त्यांनी नेहरुंसोबत जवळून काम केलं होतं. अंबिक सोनी यांनी संजय गांधी यांच्यासोबतही काम केलं होतं. तसंच पक्षाच्या अनेक संघटनांची जबाबदारी त्यांच्याकडे होते. अंबिका सोनी पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील असून अनेकदा राज्यसभेच्या सदस्य राहिल्या आहेत.

अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सुनील जाखड, सुखजिंदरसिंग रंधावा यांची नावं आघाडीवर आहेत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या बैठकीनंतर पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही बैठक थोड्याच वेळात चंदीगडमध्ये होणार आहे.

अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे २४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं; ठरले पहिले मुख्यमंत्री

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर दोन उपमुख्यमंत्र्यांची नावेही जाहीर केली जाऊ शकतात आणि शपथविधी सोहळा सोमवारी होण्याची शक्यता आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत पंजाब काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदाची निवड करण्याची विनंती करणारा ठराव एकमताने मंजूर केला होता. ही बैठक राहुल गांधी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झाली.

कोणाला मिळू शकतं मुख्यमंत्रीपद?

मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सुनील जाखड, सुखजिंदरसिंग रंधावा यांची नावं आघाडीवर आहेत. याशिवाय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंबिका सोनी, तृप्त राजिंदर सिंग बाजवा, ब्रह्म मोहिंद्रा, विजय इंदर सिंगला, पंजाब काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुलजीत सिंह नागरा आणि खासदार प्रताप सिंह बाजवा यांच्या नावाची देखील चर्चा आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी जे नाव समोर येतंय ते आहे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार राजकुमार वेरका. त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आल्यास ते दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतील.

दरम्यान, काँग्रेसच्या शक्तिशाली अशा प्रादेशिक नेत्यांपैकी एक असलेले अमरिंदर सिंग यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. ‘‘हा माझा पंजाब आहे. मी माझ्या राज्यासाठी शक्य ते सर्व केले. मी गेली ५२ वर्षे राजकारणात आहे, यापुढेही राहीन. मी राजीनामा दिला आहे; परंतु राजकारणात पर्याय कधीच संपत नाहीत,’’ असे अमरिंदर पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.