News Flash

पंजाबमधील काँग्रेसमधील वाद संपला!; मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार म्हणाले…!

पंजाब काँग्रेसमध्ये असलेला वाद आता शमण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री आणि नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील वाद सोडवण्यात पक्षश्रेष्ठींना यश येताना दिसत आहे.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या फार्महाउसवर पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांची भेट झाली. (Photo- ANI)

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला वाद आता शमण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील वाद सोडवण्यात पक्षश्रेष्ठींना यश येताना दिसत आहे. काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी दिल्ली दरबारी हजेरी लावली होती. शुक्रवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची चंदीगडमध्ये भेट घेतली. तसेच दिल्लीवारीवरून परतलेले नवजोत सिंह सिद्धू यांनी मंत्री आणि आमदारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे आज संध्याकाळी पंजाब काँग्रेसमधील कलह संपण्याची शक्यता आहे. नवजोत सिंह सिद्धू यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यासोबत ४ कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या फार्महाउसवर पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी भेट घेतली. “पंजाब प्रभारी हरीश रावत यांच्यासोबत सकारत्मक चर्चा झाली. पक्षश्रेंष्ठींचा निर्णय आम्हाला मान्य असेल. काही मुद्दे आहेत ते पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आणून देण्यास सांगितलं आहे”, असं मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी बैठकीनंतर सांगितलं. या बैठकीत शाम सुंदर अरोराही उपस्थित होते. दुसरीकडे दिल्लीतून पंजाबमध्ये आलेले नवजोत सिंह सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांची भेट घेतली. जाखर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मंत्री आणि आमदारांशी संवाद साधला. मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या निवासस्थानी त्यांनी आमदार अमरिंदर सिंह राजा वडिंग आणि कुलबीर सिंह जीरा यांची भेट घेतली.

पंजाबमधील अंतर्गत कलहापुढे गेल्या काही दिवसात काँग्रेस पक्षश्रेष्ठी हतबल झाल्याचं दिसून आलं. “पक्षश्रेष्ठींचा जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मान्य असेल.”, असं हरीश रावत यांनी चर्चेनंतर सांगितलं. काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू आपली ताकद दाखवण्यासाठी आमदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 4:12 pm

Web Title: punjab congress politics navjot singh sidhu will be state party chief rmt 84
टॅग : Punjab
Next Stories
1 7th Pay Commission : DA वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज; केंद्र लवकरच घेणार महत्त्वाचा निर्णय
2 अमेरिकेत आता मंकीपॉक्स आजाराची दहशत; आजाराबाबत जाणून घ्या
3 मृत्यूचा पूर : १५ मिनिटांमध्ये गावच्या गावं पाण्याखाली गेली; १५३ जणांचा मृत्यू, एकट्या जर्मनीतच १३३ दगावले
Just Now!
X