महाराष्ट्र, दिल्लीच्या धर्तीवर पंजाब प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंह बाजवा यांची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे. येत्या आठवडय़ात यासंबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. बाजवा यांना हटवण्याची मागणी करणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांच्याकडे राज्याची संघटनात्मक धुरा सोपवण्यात येईल. सलग सात वर्षे प्रदेशाध्यक्षपदावर असलेल्या माणिकराव ठाकरे यांची अलीकडेच काँग्रेस हायकमांडने गच्छंती केली होती. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवून महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने संघटनात्मक फेरबदल केले आहेत. दिल्लीतही लोकसभा व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रभाव पाडू न शकलेल्या अरविंदरसिंह लवली यांच्याऐवजी माजी केंद्रीयमंत्री अजय माकन यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले.