सध्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्यानिमित्ताने पंजाबमधील अमली पदार्थांच्या नशेचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. ड्रग्जच्या आहारी गेल्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या पंजाबच्या खेड्यांमधील अनेक कहाण्या दररोज ऐकायला मिळत आहेत. कपुरथळाच्या टोकाला पठाणकोट महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर वसलेल्या बुट या गावात गेल्यानंतर हेच विदारक वास्तव अनुभवायला मिळते. ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले अशी ओळख असलेल्या बुट या गावात अमली पदार्थ कायद्यातंर्गत (एनडीपीएस) सर्वाधिक म्हणजे ४७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. या गावातील कोणत्याही घरातील निदान एकातरी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे स्थानिक सांगतात.

त्यामुळे या गावातील बहुतांश व्यक्ती एकतर जेलमध्ये आहेत किंवा जामिनावर तरी आहेत. अनेकांसाठी ही धक्कादायक गोष्ट असली तरी येथील पोलिसांना किंवा स्थानिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना या गोष्टीचे नावीन्य नाही. बुट या गावातील अनेकजण मजूर असून येथील कुटुंबे हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत आहेत. रायसीख जातीच्या समाजातील या लोकांमध्ये निरक्षरतेचे प्रमाणही खूप मोठे आहे. आरोग्य सुविधेच्याबाबतीत बोलायचे झाले तर याठिकाणी केवळ सर्वसाधारण रोगांवर उपचार करणारे ‘टाईमपास डॉक्टर्स’ पाहायला मिळतात. या सगळ्या भीषण परिस्थितीमुळे पंजाबमध्ये हे गाव कुख्यात आहे. मात्र, स्थानिकांच्या मते पोलिसांमुळेच गावाची प्रतिमा मलीन झाली आहे. पोलीस त्यांचे महिन्याचे टार्गेटस पूर्ण करण्यासाठी अनेकदा गावातील निष्पाप लोकांनाही जेलमध्ये टाकतात. यापैकी बहुतेकजणांना लाच देण्याची ऐपत नसल्यामुळे जेलमध्ये जावे लागते. हा आरोप काहीप्रमाणात पोलिसांनाही मान्य आहे. पोलिसांचा यामध्ये सहभाग नाही हे आम्ही नाकारत नाही . मात्र, त्यांचे प्रमाण केवळ चार-पाच टक्के असल्याची माहिती पोलीस अधिकारी रंजीत सिंग यांनी दिली.
दुसऱ्या बाजुला येथील स्थानिकांनी दिलेली माहितीदेखील रंजक आहे. जसपाल सिंग यांना याबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की, तुम्हाला याठिकाणी ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या लोकांची यादी घेऊन फिरण्याची गरज नाही. येथील कोणत्याही घरात जा, तुम्हाला ड्रग्जसेवनाचा गुन्हा असलेली एकतरी व्यक्ती मिळेल. जसपाल यांचे मासिक उत्पन्न १५००-२००० असून अनेकदा त्यांना मिळेल ते काम करावे लागते. जसपाल यांच्यावर एनडीपीसीतंर्गत दोन गुन्हे दाखल आहेत. याउलट कहाणी आहे ती निर्व्यसनी असलेल्या बलदेव सिंग या २२ वर्षीय तरूणाची. बलदेव निर्व्यसनी असूनही पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकले होते. अटक करण्याचे कारण विचारले असता आम्हाला महिन्याचे टार्गेट पूर्ण करायचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसानंतर मला कळाले की, माझ्याविरुद्ध घरात पाच किलो पॉपी हस्क या अमली पदार्थाचा साठा केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. थोड्याफार फरकाने गावातील अनेक घरांमध्ये हेच वास्तव पाहायला मिळते.