पंजाबमधील होशियापूरमधील एका १८ वर्षाच्या मुलीने सोशल मीडियावर लाईव्ह करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणीने आपला आत्महत्येचा व्हिडियो लाईव्ह केला. या व्हिडियोमध्ये आपल्या बॉयफ्रेंडने आपल्याला धोका दिल्याने आपण असे कृत्य करत असल्याचे तिने सांगितले आहे. आपला बॉयफ्रेंड इंदर हा आपल्या आत्महत्येला कारणभूत असल्याचे तिने सुसाईड नोटमध्येही लिहून ठेवले आहे. भाड्याने घेतलेल्या घरामध्ये या तरुणीने आत्महत्या केली आहे. या मुलीचे वडिल फ्रान्समध्ये असतात तर तिच्या आईचा ४ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी रात्री या तरुणीच्या बाजूला राहणारी एक मुलगी तिला जेवायला जाण्यासाठी बोलवायला गेली. तेव्हा बराच वेळ आतून कोणताही आवाज आला नाही. तेव्हा या मुलीने आतमध्ये वाकून पाहिले तर ही तरुणी फासाला लटकत असल्याचे तिला दिसले. घटना समजताच पोलिस याठिकाणी दाखल झाले. त्यावेळी याठिकाणी एक कॅमेरा लावण्यात आला होता आणि त्यामध्ये ही तरुणी फास घेत असल्याचे रेकॉर्ड झाल्याचे दिसले. याच माध्यमातून या तरुणीने आपली आत्महत्या लाईव्ह दाखविल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळे आत्महत्या करणे आणि तिही सोशल मीडियावर अशापद्धतीने दाखविणे यामागे नेमकी काय मानसिकता असेल असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.