पंजाब नॅशनल बँकेने ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर म्हणून ए. के. प्रधान यांची नियुक्ती केली आहे. सध्या त्यांच्याकडे पीएनबीचे जनरल मॅनेजर पद होते. मात्र आता त्यांची नियुक्ती ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर म्हणून करण्यात आली आहे. पब्लिक सेक्टरमध्ये येणाऱ्या बँकांनी तांत्रिकी घोळ आणि घोटाळे टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी येत्या १५ दिवसांच्या कालावधीत घ्यावी असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर लगेचच ए. के. प्रधान यांना ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर म्हणून नियुक्त केले.

नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी पीएनबीला १३ हजार ४०० कोटींचा चुना लावला. या सगळ्या घोटाळ्यात बँकेच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश होता. लाच घेऊन लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज नीरव मोदीला देण्यात आली. त्याचमुळे नीरव मोदी कर्ज बुडवून भारताबाहेर पळाला हे आपल्याला ठाऊक आहेच. नीरव मोदीचे प्रकरण उघडकीस आल्यावर इतर बँकांनाही काही व्यापाऱ्यांनी चुना लावल्याची प्रकरणे उघडकीस आली. या सगळ्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बँकांनी काळजी घ्यावी आणि असे घोटाळे टाळण्यासाठी योग्य त्या माणसांची नियुक्ती करावी असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. त्यानंतर ए. के. प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजलाही या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातली माहिती दिली आहे.