अत्यंत गोपनीय पासवर्ड पुरवल्यानेच नीरव मोदी याला बनावट समझोता पत्रे मिळू शकली, अशी कबुली पीएनबी-मोदी घोटाळ्यातील अटक आरोपी व पंजाब नॅशनल बँकेचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी यांनी दिली असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. या मदतीच्या मोबदल्यात लाच घेतल्याचेही शेट्टी यांनी मान्य केले आहे. बँकेचा गोपनीय ‘लेव्हल ५’ पासवर्डद्वारे ‘स्विफ्ट’ नावाच्या बँकेच्या सॉफ्टवेअरची मदती घेऊन ‘लेटर ऑफ अंडरस्टँडिंग’ म्हणजे समझोतापत्रे नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्या कंपन्यांसाठी शेट्टी यांनी बेकायदा उपलब्ध करून दिली. शेट्टी व मनोज खरात या दोघांना सीबीआयने शनिवारी अटक केल्यानंतर त्यांनी जाबजबाबात आरोपांची कबुली दिली. ‘सहायक उपमहाव्यवस्थापकांच्या पातळीवर वापरला जाणारा ‘लेव्हल ५’ पासवर्ड माहिती होता व त्याच्या माध्यमातून समझोतापत्रे काढत गेलो. हा पासवर्ड नीरव मोदी, त्याच्या कंपनीचे कर्मचारी, संचालकांनाही दिला होता,’ असे शेट्टी यांनी कबुलीजबाबात सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत फोर्ट भागातील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेत शेट्टी व खरात काम करीत होते; ते गेली अनेक वर्षे याच शाखेत कार्यरत होते. वास्तविक, शेट्टी यांची २०१३ मध्ये बदली करण्यात आली होती. पण, ते आदेश त्याला देण्यातच आले नाहीत. बँकेत दर तीन वर्षांनी बदली अनिवार्य असताना हे दोघेही बदलीपासून अलिप्त राहिले.

इतर बँकाही रडारवर

परदेशातील भारतीय बँकांच्या इतर शाखांचीही चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. हाँगकाँग येथील अलाहाबाद बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, युको बँक, अ‍ॅक्सिस बँक हेही या सात वर्षे चाललेल्या घोटाळ्यात सामील होते. समझोतापत्रांची मुदत ९० दिवस असताना मुदत ३६५ दिवस वाढवण्यात आली. हाँगकाँगमध्ये ११ भारतीय  बँका कार्यरत असून त्यात अलाहाबाद बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश आहे. स्टेट बँकेला पीएनबी-मोदी घोटाळ्यात २१२ दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाला ३०० दशलक्ष डॉलर्स तर युको बँकेला ४११.८२ दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला आहे. अलाहाबाद बँकेला २००० कोटींचा फटका बसला आहे.

मोदी, तुम्हीच दोषी असल्यासारखे वागू नका!

परीक्षेत उत्तीर्ण कसे व्हावे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांना दोन तास भाषण देतात, पण २२ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यावर ते दोन मिनिटेही बोलत नाहीत. अर्थमंत्री अरुण जेटली हेही लपलेले आहेत. तुम्ही दोषी असल्यासारखे वागणे बंद करा आणि काही तरी बोला, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचा संदर्भ याला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab national bank fraud case cbi arrests gokulnath shetty
First published on: 19-02-2018 at 01:05 IST