बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीचे अंबानी कुटुंबीयांशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. धीरुभाई अंबानींच्या नातीचे नीरव मोदीच्या लहान भावाशी लग्न झाले असून डिसेंबर २०१६ मध्ये गोव्यामध्ये थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला.

पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अब्जाधीश हिरेव्यापारी नीरव मोदी मुख्य सूत्रधार आहे. नीरव मोदीची नामांकित कंपनी असून बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री त्याच्या कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर होत्या. नीरव मोदीची राजकारणातील बडा नेत्यांशीही ओळख होती. आता नीरव मोदीचे देशातील सर्वात मोठे उद्योजक अर्थात अंबानी कुटुंबीयांशीही संबंध असल्याचे समोर आले आहे.

मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांची भाची इशिता साळगावकरचे लग्न नीरव मोदीचा लहान भाऊ नीशाल मोदीशी झाले आहे. इशिता ही दिप्ती साळगावकर यांची कन्या आहे.  दिप्ती या धीरुभाई अंबानी यांच्या कन्या आहेत. साळगावकर कुटुंबही गोव्यातील मोठे उद्योजक आहेत. एप्रिल २०१६ मध्ये इशिता आणि नीशालचा साखरपुडा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला होता. या सोहळ्याला ८० ते १०० जणच उपस्थित होते. नीशाल मोदी हा नीरव मोदीच्या व्यवसायातही सक्रीय असल्याचे समजते. नीरव मोदी हा ४७ वर्षांचा असून त्याचे वडील हे देखील हिरेव्यापारीच होते. व्यवसायानिमित्त ते बेल्जियममध्ये स्थायिक झाले होते. नीरव आणि नीशाल हे दोघे हिरे व्यापार आणि ज्वेलरीशी संबंधित क्षेत्रातच कार्यरत आहेत.

दरम्यान, नीरव मोदीच्या घरावर ईडीने गुरुवारी सकाळी छापा टाकला. त्याचे घर सिल केल्याचे समजते. दुसरीकडे नीरव मोदीने देशाबाहेर पळ काढला आहे. तो सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे सूत्रांकडून समजते. आता नीरव मोदीला भारतात आणून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तपास यंत्रणांकडून काय पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही निवडक खातेदारांच्या फायद्यासाठी बँकेच्या दक्षिण मुंबईतील एका शाखेतून काही फसवे आणि अनधिकृत व्यवहार झाले होते. दोन कर्मचाऱ्यांनी बँकेच्या परदेशातील शाखांमधून फसवणुकीद्वारे नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांना कर्जउभारणीसाठी बनावट हमीपत्रे जारी करवून घेतल्याचा आरोप आहे.