भारतीय तपासयंत्रणांनी एकाच दिवसात पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या संघटनेला दोनवेळा धोबीपछाड दिला आहे. सर्वात आधी काश्मीरच्या हंदवाडा भागात पोलिसांनी अतिरेक्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या ‘लष्कर’च्या ३ एजंटना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी कोट्यवधी रुपये आणि २१ किलो हेरॉईन जप्त केलं. यानंतर पंजाब पोलिसांनी गुरुवारी पठाणकोट भागात कारवाई करत ‘लष्कर’च्या दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. आमिर हुसेन वानी आणि वासिम हसन वानी अशी या दोन्ही अतिरेक्यांची नावं आहेत.

या कारवाईत पोलिसांनी दोन्ही अतिरेक्यांकडून दहा हँड ग्रेनेड, एके-४७ रायफल, २ मॅगझीन आणि ६० जिवंत काडतुसं जप्त केली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांवर मोठा हल्ला करण्याची लष्कर-ए-तोयबाची तयारी असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली. याचसाठी दोन्ही अतिरेक्यांकडे शस्त्रसाठा आला होता. मात्र पोलिसांनी वेळेत कारवाई करत लष्करचा हा डाव उलटवला आहे. अटक केलेल्या दोन्ही अतिरेक्यांकडे शस्त्रसाठा पंजाबवरुन काश्मिरला पोहचवण्याची जबाबदारी होती. मात्र पठाणकोट भागात पोलिस गस्तीत या दोन्ही अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे.

अवश्य वाचा – अतिरेक्यांना अर्थसहाय्य करणारे रॅकेट पोलिसांकडून उध्वस्त, कोट्यवधी रुपयांसह अमली पदार्थांचा साठा जप्त

पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अतिरेक्यांना पंजाबमधून शस्त्रसाठा जमवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हे काम पंजाब पोलिसांमध्ये काही वर्षांपूर्वी कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या अश्फाक अहमद दर उर्फ बाशिर अहमद खान यानेच दोन्ही अतिरेक्यांना दिलं होतं. २०१७ पासून दार हा बेपत्ता असून तो काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाला जाऊन मिळाला आहे. कोणालाही संशय येऊ नये म्हणून शस्त्रसाठा असलेल्या ट्रकमध्ये दोन्ही अतिरेक्यांनी फळं आणि भाजीपाला ठेवला होता. आमिर वानी हा याआधीही पंजाबला येऊन गेला होता. या कामासाठी हवालाच्या माध्यमातून त्याला २० लाखांची रोकड मिळाली होती. पंजाबमध्ये अतिरेक्यांना आश्रय देण्याचं काम आमिर आणि वासिम या दोघांकडे होतं अशी माहिती पोलिसांनी दिली.