जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर नाभिकाच्या मुलीनं यशाला गवसणी घातली आहे. पंजाब बोर्डाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये नाभिकाच्या मुलीनं मिळवलेले गुण पाहून सर्वजण थक्क झाले. व़डील नाभिक असणाऱ्या जसप्रीत कौरने ९९.५ टक्के गुण मिळवत वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे.

जसप्रीत कौरच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे कोचिंग क्लासेसही कधी तिने पाहिले नाहीत. जसप्रीतने घरीच आपल्या अभ्यास करुन न भूतो न भविष्य असं यश संपादन केलं आहे. जसप्रीत कौरचे वडील बलदेव सिंह एक नाभिक असून प्रतिदिन ते सरासरी दोनशे रुपये कमावतात.

जसप्रीत कौर मनसा जिल्ह्यात राहणारी आहे. तिच्या या उज्वल यशानं गावात आनंदाचं वातावरण असून सर्वजण शुभेच्छा देत आहेत. तुमची मुलगी हुशार असल्याचं गावातील सर्वजण बलदेव सिंह यांना म्हणतात. गावातील लोकांचे हे शब्द ऐकून बलदेव सिंह यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात.

जसप्रीतने पंजाब बोर्डाच्या परीक्षेत ४५० पैकी ४४८ गुण मिळवलं आहेत. जसप्रीत मेरिट लिस्टमध्ये आली आहे. जसप्रीतला एमफील करायचं असून इंग्रजी विषयाचं प्राध्यापक व्हायचं आहे. शिक्षण घेत काम करणार असल्याचं जसप्रीतनं माध्यमांना सांगितलं.