पंजाबमधील पतियाळा येथील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने १७ वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलाच्या पालकांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई केली आहे. मुख्याध्यापिकेने गुरु- शिष्याच्या नात्याला काळीमा फासल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.

पतियाला जिल्ह्यातील घनौरमधील सरकारी शाळेत शिकणाऱ्या १७ वर्षाच्या मुलाचा मुख्याध्यापिकेकडून लैंगिक छळ सुरु होता. मुख्याध्यापिका त्याच्याकडे शरीरसंबंधांसाठी वारंवार मागणी करत होती. विद्यार्थ्याने वर्गाऐवजी मुख्याध्यापिकेच्या कक्षात बसावे तसेच रात्री घरी यावे यासाठी मुख्याध्यापिका विद्यार्थ्यावर दबाव टाकत होती. विद्यार्थ्याशी मतभेद होताच मुख्याध्यापिकेने त्याला शाळेतून काढून टाकले. हा प्रकार मुलाच्या पालकांना समजताच पालक आणि ग्रामस्थांनी शाळेबाहेर निदर्शने केली.

मुख्याध्यापिकेवरील या गंभीर आरोपांची दखल घेत शिक्षण विभागाने शिक्षण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. शिक्षण अधिकारी निशा जलोटा यांनी या प्रकरणाच्या चौकशीनंतर शिक्षण विभागाला अहवाल पाठवला. यानंतर संबंधीत मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्याध्यापिकेने या विषयी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मुख्याध्यापिकेचे प्रताप यापूर्वीही उघड झाले होते. वर्षभरापूर्वी मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्यासोबतचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या विद्यार्थ्यानेही मुख्याध्यापिकेवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. शिक्षण मंत्र्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचले होते. मात्र राजकीय दबावातून मुख्याध्यापिकेवर कारवाई झाली नव्हती अशी चर्चा आहे. मुख्याध्यापिकेच्या पतीने मात्र पत्नीवरील आरोप फेटाळून लावले आहे. माझ्या पत्नीविरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे. मात्र सत्य समोर येईलच असे त्यांनी सांगितले.