बदनामीच्या भीतीपोटी कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल न केल्याने पंजाबमध्ये १७ वर्षांच्या बलात्कार पीडितेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. पंजाबच्या फझिलका गावात ही घटना घडली. २५ ऑक्टोबरला या मुलीवर बलात्कार झाला होता. मात्र, तिच्या पालकांनी बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही. तसेच जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयातही नेले नाही. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलगी गावातील स्थानिक सरकारी शाळेत ११ व्या इयत्तेत शिकत होती. ती शाळेत जात असताना तीन नराधमांनी तिला अडवले तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि जखमी अवस्थेत झुडुपांमध्ये टाकून दिले.

दरम्यान, पीडित मुलगी घरी न आल्यामुळे तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांनी मुलगी झुडपांमध्ये जखमी अवस्थेत आढळून आली. कुटुंबाची नाचक्की होईल या भीतीपोटी तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. त्यानंतर मुलगी जखमी असूनही तिच्यावर उपचार करण्यात आले नाही. दरम्यान, काही गावकऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस मुलीच्या घरी पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, असे जलालाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उप-अधीक्षक अमरजित सिंह यांनी सांगितले.

या सामूहिक बलात्कार प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडित मुलीच्या आईने तीन नराधमांपैकी एकाची ओळख पटवली असून तो या मुलीच्या वर्गात शिकत असल्याचीही माहिती समोर आली आहे. पीडित मुलीच्या वर्गात असलेला आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. हे तिघेही फरार आहेत. पीडित मुलीचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच तीन अज्ञातांविरोधात पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.