बैसाखीनिमित्त पाकिस्तानमध्ये गेलेल्या पंजाबमधील एका शीख महिलेने धर्मांतर करुन लाहोरमधील एका व्यक्तीशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील आयएसआय या गुप्तचर यंत्रणेने तिला अडकवल्याचा दावा महिलेच्या कुटुंबीयांनी केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र खात्याने तिची सुटका करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात राहणारी ३१ वर्षांची किरन बाला ही महिला १२ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये गेली होती. शिरोमणी गुरुद्वारा समितीतर्फे दरवर्षी पाकिस्तानमध्ये तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते. या वर्षी १८०० भाविक पाकिस्तानमध्ये गेले आहे. यात किरण बालाचा समावेश आहे. पाच दिवसांपूर्वी किरण बाला बेपत्ता झाली. तिच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय देखील चिंतेत होते.

दुसरीकडे किरण बालाने पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाला एक पत्र पाठवले आहे. या पत्रात तिने दुसरे लग्न केल्याचा दावा केला आहे. मी लाहोरमधील मोहम्मद आझम या तरुणाशी विवाह केला असून मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मी आता भारतात परतू शकत नाही. माझ्या व्हिसाची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती तिने पत्रात केली आहे. मोहम्मदशी निकाह केल्यानंतर तिने नाव बदलले आहे. अमिनाबिबी असा उल्लेख तिने पत्रात केला आहे.

किरण बालाच्या या पत्राने होशियारपूरमध्ये राहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. किरण बालाच्या पतीचे २०१३ मध्ये अपघातात निधन झाले होते. ती सध्या सासरीच राहत होती. तिला १२ वर्षांची मुलगी आणि दोन लहान मुलंदेखील आहे. माझ्या सूनेला आयएसआयने अडकवल्याचा आरोप तिचे सासरे तसरेम सिंग यांनी केला आहे. सुषमा स्वराज यांनी तिला सुखरुप परत आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

किरण बालाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला फोनवरुन प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही फेसबुकवरुन भेटलो नाही. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संपर्कात आलो, असे तिने सांगितले. मात्र कोणत्या साईटद्वारे ती पाकिस्तानी व्यक्तीच्या संपर्कात आली, याचा तपशील जाहीर करण्यास तिने नकार दिला. मी स्वेच्छेने हा निर्णय घेतला. माझ्यावर कोणीही बळजबरी केलेली नाही, असे सांगून तिने फोन ठेवून दिला.