पंजाबमधील नवीन वर्षाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या लोहरी बंपर २०२१ लॉट्ररीचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमधील एका मध्यमवर्गीय घरातील संगीता चौबे या महिलेला या लॉट्ररीमध्ये अडीच कोटींचे बक्षीस मिळालं आहे. विशेष म्हणजे पंजाब राज्य सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या या लॉट्रीचे तिकीट संगीता यांनी आपल्या सासऱ्यांच्या सांगण्यानंतर खरेदी केलेले. याच तिकीटाला बंपर लॉट्ररी लागल्याने सध्या चौबे कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

गृहिणी असणाऱ्या संगीता लहान मुलांचे क्ले मॉडलिंग आणि चित्रकलेचे क्लास घेतात. संगीता यांनी मला एवढ्या मोठ्या रक्कमेची लॉट्ररी कधी लागेल असा विचारही केला नव्हता. मी एवढी मोठी रक्कम लॉट्ररीमध्ये जिंकेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं म्हणत आपला आनंद व्यक्त केला आहे. ४८ वर्षीय संगीता यांनी माझे सासरे मागील अनेक वर्षांपासून लॉट्ररीचं तिकीट काढायचे अशीही माहिती दिली. माझे सासरे नेहमी लॉट्ररीचं तिकीट काढायचे पण त्यांना कधी एवढं मोठं बक्षीस मिळालं नाही. एकदा त्यांनी मलाच लॉट्ररीचं तिकीट काढायला सांगितलं. मी ही त्यांचं ऐकून लॉट्ररीचं तिकीट काढलं आणि मला खरोखरच पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीय, असं संगीता सांगतात.

पुरस्काराची रक्कम मिळवण्यासाठी आज पंजाब सरकारच्या लॉट्ररी विभागाकडे आवश्यक कागदपत्र आणि तिकीट जमा केल्यानंतर संगीता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संगीता यांनी त्यांचे पती एका खासगी कंपनीमध्ये काम करतात अशी माहिती दिली. तसेच त्यांना एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. या पैशांमधून आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी गुंकतवणूक करणार असल्याचंही संगीता यावेळी म्हणाल्या. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याने आमच्या अनेक आर्थिक अडचणी सुटतील असंही संगीता यांनी सांगितलं.

दरवर्षी पंजाबमध्ये जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीच्या दिवशी लोहरी बंपर लॉट्ररीची सोडत निघते. यंदा या लॉट्ररीच्या तिकीटाची किंमत ५०० रुपये ठेवण्यात आली होती. पंजाबमधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये लॉट्ररीवाल्यांकडे या लॉट्ररीची तिकीटं मिळतात. ऑनलाइन माध्यमातूनही तिकीटांची विक्री केली जाते. आता पंजाब सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या होळी आणि बैसाखी स्पेशल लॉट्रीची विक्री लवकरच सुरु होईल.