केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवरील कथित पोलीस अत्याचारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पंजाब विद्यापीठाच्या ३५ विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांना लिहिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने या पत्रासाठी डायरी क्रमांक दिला असून, या पत्राची नोंदणी होऊन त्याची जनहित याचिका म्हणून सुनावणी होऊ शकते, असे या पत्रावर सह्य़ा करणाऱ्यांपैकी आंचल शर्मा हिने सांगितले.
शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस पाण्यांच्या तोफा, अश्रुधुराच्या नळकांडय़ा आणि लाठय़ा यांचा बेकायदेशीर वापर करत असून, याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे विद्यापीठाच्या ‘मानवी हक्क व कर्तव्ये केंद्रा’च्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे.

पोलिसांचे कथित अत्याचार आणि काही जणांची अवैध स्थानबद्धता यांच्या चौकशीची मागणी करतानाच, ‘निष्पाप शेतकऱ्यांविरुद्ध राजकीय वैरापोटी नोंदवण्यात आलेले’ सर्व गुन्हे मागे घेण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.