07 June 2020

News Flash

पंजाबमधील ड्रग्ज व्यसनाचे वास्तव आणि साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार!

अमली पदार्थ जवळ बाळगल्याने आज पंजाबमधील अनेक तरूण-तरुणी तुरुंगात आहेत

पंजाबला पडलेला अमली पदार्थांचा विळखा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने अमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू केली आहे की व्यसनाधीन व्यक्तींच्या विरोधात असा प्रश्न पडला आहे.

‘उडता पंजाब’ या चित्रपटामुळे पंजाबमधील तरूण-तरुणींना लागलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पंजाबला अमली पदार्थांचा विळखा पडत असल्याचे दिसू लागल्यावर राज्य सरकारने लगेचच कारवाई सुरू केली. पण त्याचा परिणाम व्यसनमुक्तीमध्ये होण्याऐवजी केवळ कायद्याचा बडगा उगारण्यावरच सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. साप साप म्हणून भुई धोपटण्याचाच हा प्रकार असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. अमली पदार्थ जवळ बाळगल्याने आज पंजाबमधील अनेक तरूण-तरुणी तुरुंगात आहेत. पण प्रश्नाचे उत्तर अजून सापडलेले नाही.
नार्को वॉर: पंजाबमधील ड्रग्ज व्यसन
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या संशोधनातून प्रत्येकाचेच डोळे उघडणारे निष्कर्ष समोर आले आहेत. पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी कोणालाही दयामया दाखवणार नाही, असे सांगत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात अभियानच उघडले. यामुळे पंजाबमध्ये २०१४ साली १७,०६८ नागरिकांना तर २०१५ मध्ये ११,५९३ नागरिकांना कैद करण्यात आले. एवढं सगळ करूनही पंजाबला पडलेला अमली पदार्थांचा विळखा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने अमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू केली आहे की व्यसनाधीन व्यक्तींच्या विरोधात असा प्रश्न पडला आहे.
ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या पंजाबमधील गावाचे विदारक वास्तव 
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या आठ महिन्यांच्या संशोधनामध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत एकूण ६५९८ प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) मिळाले. त्यानुसार या प्रकरणात अटक झालेल्या ६०२८ आरोपींपैकी २५५५ म्हणजेच ४२.४ टक्के आरोपींना पाच ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी हेरॉईन, १०० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी इंटॉक्सिकंट पावडर, ५० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी ओपियम, एक किलो किंवा त्यापेक्षा कमी पॉपी हस्क जवळ बाळगल्याने अटक करण्यात आली.
यासंदर्भात बोलताना पंजाबमधील माजी पोलीस महासंचालक आणि नशा विरोधी मंच या स्वयंसेवी संघटनेचे प्रमुख शशिकांत म्हणाले, ज्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्या अत्यंत छोट्या व्यक्ती आहेत. अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या बड्या धेंडांना अजून हात लावण्यात आलेला नाही. केवळ अटक करण्यात आलेल्यांचा आकडा फुगवण्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत. त्यामागे सरकारचीही कोणतीही दूरदृष्टी दिसत नाही. अमली पदार्थांचे व्यसन हा एक आजार आहे. त्या लोकांना तुरुंगात डांबून काय साध्य होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 12:26 pm

Web Title: punjabs war on drugs is more a war on drug addicts
Next Stories
1 VIDEO : भारताला मुस्लिममुक्त करण्याची वेळ आलीय- साध्वी प्राची
2 Amazon.in: अॅमेझॉन भारतात आणखी तीन अब्ज डॉलर गुंतवणार, रोजगार निर्मितीची संधी
3 Maharashtra Bullet Train Project : महाराष्ट्राच्या भूमिकेमुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प अडकला; मोदींद्वारे मध्यस्थी करण्याचा विचार
Just Now!
X