प्रशासनाने घातलेल्या र्निबधांच्या निषेधार्थ पुरीच्या शंकराचार्यानी रथयात्रेवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयावरून मोठा वाद उफाळून आला आहे. धार्मिक प्रश्नांमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नसल्याचे दोन केंद्रीय मंत्री आणि आसामच्या राज्यपालांनी म्हटले आहे.
रथयात्रा सुरू होण्यापूर्वी रथाची पाहणी करणे पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी टाळले. त्यामुळे रथयात्रा प्रस्थान करण्यापूर्वी शंकराचार्यानी भेट देण्याची कित्येक वर्षांची परंपरा खंडित झाली. ही बाब स्वीकारार्ह नाही, असे आसामचे राज्यपाल आणि ओदिशाचे माजी मुख्यमंत्री जे. बी. पटनाईक यांनी म्हटले आहे.
धर्मनिरपेक्ष देशात सरकारने कोणत्याही समाजाच्या धार्मिक प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि परंपरा मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी केली आहे.
सदर वादामुळे राज्य ढवळून निघाले असतानाही राज्य सरकारने अद्याप शंकराचार्याशी चर्चा करू नये, ही दुर्दैवी बाब आहे, असेही ओराम म्हणाले.