29 September 2020

News Flash

स्नोडेन मॉस्को विमानतळावरच

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे बिंग फोडणारा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन हा हाँगकाँगहून पोबारा केल्यानंतर रशियात आला. तेथून तो हवानामार्गे इक्वेडोरला जाणे अपेक्षित असताना तो गेलाच

| June 27, 2013 02:16 am

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे बिंग फोडणारा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन हा हाँगकाँगहून पोबारा केल्यानंतर रशियात आला. तेथून तो हवानामार्गे इक्वेडोरला जाणे अपेक्षित असताना तो गेलाच नाही. गेले चार दिवस तो मॉस्को विमानतळाजवळच वास्तव्यास आहे. तो पुढे कुठे जाणार याबाबत अजूनही गूढ कायम आहे. त्याला अमेरिकेत परत पाठवून द्यावे, अशी विनंती अमेरिकेने केली असली तरी त्याला अमेरिकेच्या ताब्यात देण्यास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नकार दिला आहे. स्नोडेनने इक्वेडोरकडे आश्रय मागणारी विनंती केली असून स्नोडेनला आश्रय दिल्यास अमेरिका आपली निर्यात बंद करील, अशी भीती तेथील विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे. स्नोडेनला रशियातून हाकलण्यासाठी पूर्ण कायदेशीर आधार आहे, असे अमेरिकेने रशियाला सांगितले आहे.

रशियाचे उत्तर
गोपनीयता विरोधी संकेतस्थळ असलेल्या विकिल१क्सने स्नोडेनला हाँगकाँगहून मॉस्कोत येण्यास मदत केली आहे. विकिलीक्सच्या मते स्नोडेन कायमचा रशियात अडकून पडण्याची भीती आहे. दरम्यान व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे योगायोगाने पुढील आठवडय़ात ऊर्जा शिखर बैठकीसाठी मॉस्कोत येत आहेत. मादुरो यांनी असे सांगितले की, इक्वेडोरप्रमाणेच आम्ही स्नोडेनच्या आश्रय मागणाऱ्या विनंतीची तपासणी करू. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी स्नोडेन मॉस्कोत असल्याचे प्रथमच अधिकृतपणे मान्य केले असून त्याने विमानतळावरील तात्पुरता निवारा सोडलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तो प्रवासी म्हणून आलेला आहे, देशाची सीमा ओलांडून तो आलेला नाही, असे पुतिन यांनी फिनलंड येथे सांगितले. स्नोडेन येथे येणे हे आमच्यासाठी अनपेक्षित होते. तो जेव्हा त्याचे जाण्याचे अंतिम ठिकाण निश्चित करील तेव्हा ती आमच्या व त्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट असेल, असे पुतिन यांनी सांगितले.

‘इक्वेडोर’ला भीती
स्नोडेनला आश्रय देण्याच्या विनंतीचा विचार करण्याच्या इक्वेडोरच्या निर्णयाने तेथील विरोधक संतप्त झाले असून स्नोडेनला आश्रय दिला तर अमेरिका इक्वेडोरची निर्यात बंद करून त्याचा बदला घेईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. इक्वेडोर हा दक्षिण अमेरिकेतील एक छोटासा देश असून स्नोडेनला तेथे आश्रय मिळण्याच्या शक्यतेने तो चर्चेत आला आहे. इक्वेडोरच्या व्यापार समितीचे प्रमुख रॉबटरे
अ‍ॅसपियाझू यांनी सांगितले की, असे चुकीचे निर्णय घेण्याची चैन परवडणारी नाही. स्नोडेनला राजकीय आश्रय दिल्यास निर्यात बंद
करून अमेरिका सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. अमेरिका हा इक्वेडोरचा मोठा व्यापारी भागीदार असून ४० टक्के निर्यात त्या देशात होते. वर्षांला ९ अब्ज डॉलरची ही निर्यात आहे.

स्नोडेनचा ‘द टर्मिनल’
स्नोडेन सोमवारी क्यूबाला जाणार होता व नंतर तेथून इक्वेडोरला जाणार होता, पण त्याने तसे केले नाही. पुतिन यांनी सांगितले की, स्नोडेन नेमका कुठे जाणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. स्नोडेनचा अमेरिकी पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. मात्र विकिलीक्सने दिलेल्या माहितीनुसार तो इक्वेडोरने दिलेल्या शरणार्थी कागदपत्रांवर हाँगकाँगहून मॉस्कोत आला. स्नोडेन याने मॉस्कोत मुक्काम वाढवण्याच्या घटनेची तुलना ही टॉम हँक्सच्या ‘द टर्मिनल’ या चित्रपटाशी केली जात आहे. त्यातही एक पात्र असेच विमानतळावर राहते असे दाखवले आहे. स्नोडेन शेवटी कुठल्या ठिकाणी जाणार याविषयी आता ब्रिटिश जुगार संकेतस्थळ विल्यम हिलने बेटिंग सुरू केले आहे. स्नोडेनचा पासपोर्ट रद्द करणे व मध्यस्थ देशांना लक्ष्य केले जात असल्याने स्नोडेन कायमचा रशियात राहण्याचा धोका आहे, असे विकिलीक्सने ट्विटरवर म्हटले आहे.

स्नोडेनला हाकला – अमेरिका
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्त्या केटलिन हेडेन यांनी सांगितले की, रशियाबरोबर प्रत्यावर्तन करार नसला तरी स्नोडेनला रशियाने बाहेर हाकलण्यास पुरेसा कायदेशीर आधार आहे, कारण त्याचा पासपोर्ट रद्द केलेला आहे तसेच त्याच्यावरचे आरोपही गंभीर आहेत.

अकारण दबाव
अमेरिकेची गुप्तचर माहिती उघड करणाऱ्या स्नोडेनला ताब्यात देण्याबाबत रशिया व चीनवर अमेरिका अकारण दबाव आणत आहे, त्यामुळे उलट रशिया व चीन हे देश एकमेकांच्या निकट येतील, असा इशारा रशियाच्या कनिष्ठ सभागृहाच्या परराष्ट्र कामकाज समितीचे प्रमुख अलेक्झी पुश्कोव यांनी दिला. त्यांनी सांगितले की, सीरियाच्या मुद्दय़ावर मतैक्याची गरज असताना अमेरिका अशा प्रकारे अविचाराने दबाव आणून अमेरिका-रशिया-चीन यांच्या संबंधात बाधा आणत आहे.
दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी असे म्हटले होते की, रशियाने शांत राहावे व स्नोडेनला आमच्या ताब्यात द्यावे. रशियाशी आम्हाला कुठलाही संघर्ष करायचा नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 2:16 am

Web Title: putin confirms snowden in moscow airport but denies extradition
टॅग Vladimir Putin
Next Stories
1 बेनीप्रसाद वर्मा यांच्या आरोपांमुळे काँग्रेसची पंचाईत
2 व्हिसा बाँडबाबत अंतिम निर्णय नाही
3 काश्मीर खोऱ्याला जोडणारी रेल्वे सुरू
Just Now!
X