रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील तळावर असलेल्या सैन्यास माघारी बोलावले असून  देशाच्या पूर्व भागातील चकमकी मात्र सुरूच होत्या.
पुतिन यांनी संरक्षण मंत्री सर्जे शोइगू यांना रोस्तोव, बेलगोरोड, ब्रायनस्क भागात नियोजित कवायतींसाठी पाठवलेले सैन्य माघारी घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असून गेल्या आठवडय़ात पुतिन यांनी सैन्य माघारीचे जे आश्वासन दिले होते त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी हा आदेश दिल्याचे मानले जात आहे. युक्रेनच्या सीमेवरील या तीन भागातून सैन्य माघारी घेण्यात येत असून रशियाच्या इतर प्रांतात ते तैनात केले जाणार आहे.
पुतिन यांच्या या निर्णयामुळे युक्रेनबरोबरचा चिघळलेला पेचप्रसंग आटोक्यात येण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य गुप्तचरांनीही रशियाच्या या सैन्य माघारीची सत्यता पटवली आहे. पाश्चिमात्य देशांनी मात्र रशिया सैन्य माघारी घेत असल्याची कुठलीही चिन्हे नाहीत असे म्हटले आहे.
नाटोने सांगितले की, रशियन सैन्याच्या माघारीची कुठलीही चिन्हे दिसलेली नाहीत. क्रेमलिनच्या निवेदनानुसार नेमके किती सैन्य या तीन प्रांतातून व किती पटकन माघारी घेतले जाणार आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. अमेरिका व युरोपीय समुदायाने पुतिन यांच्या सहकाऱ्यांवर क्रायमियाचा ताबा घेतल्याच्या प्रकरणी प्रवास निर्बंध घातले असून त्यांच्या मालमत्ता गोठवल्या आहेत.
रशियाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर निर्बंध टाकण्याचा इशारा अमेरिका व पाश्चात्त्य देशांनी दिला असून रशियावादी बंडखोरांनी पूर्व युक्रेनमध्ये सरकारी इमारतींचा ताबा घेऊन दोन प्रांत स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली होती. रशियावर आणखी निर्बंध टाकले जाण्याची शक्यता कायम आहे.