पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची भेट घेतली आणि तिचं कौतुक केलं आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटून पी. व्ही. सिंधूने २६ तारखेला स्वित्झर्लंड या ठिकाणी झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतपदावर आपले नाव कोरले. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहराला २१-७, २१-७ अशा सेटमध्ये हरवत पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता पी. व्ही. सिंधूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. पी. व्ही. सिंधू आपल्या देशाचा अभिमान आहे असे गौरोद्गार त्यांनी काढले आहेत. सिंधूने बॅडमिंटनच्या स्पर्धेत जगज्जेतेपदावर नाव कोरल्याचा आनंद झाला असेही मोदींनी म्हटले आहे. त्यांनी तिचं कौतुक केलं तसेच तिला भविष्यातल्या चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सिंधूने उपात्यपूर्व फेरीत शनिवारी चीनच्या चेन यू फेईचे आव्हान सहज परतवून लावले होते. सिंधूने फेईचा २१-७, २१-७ असा सरळ पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाने सिंधूला दोनवेळा हुलकावणी दिली होती. मात्र मागील अपयशावर मात करीत सिंधूने अखेर जेतेपदाला गवसणी घातली. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदकावर नाव कोरले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. सिंधू आपल्या देशाचा अभिमान आहे तिच्या कामगिरीचा गौरव वाटतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.