02 June 2020

News Flash

कासिम सुलेमानी : लोकप्रिय आणि शक्तिशाली जनरल

सीरिया आणि इराक यांच्यातील युद्धात सुलेमानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तेहरान : इराणमधील अत्यंत लोकप्रिय असामी असा लौकिक असलेले सुलेमानी हे मध्य पूर्वेतील शक्तिशाली जनरल होते आणि इराणचे अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव अनेकदा चर्चेत होते. इराणच्या कुड्स दलाच्या प्रमुखपदाची धुरा दीर्घकाळ सांभाळली होती. अमेरिका आणि त्यांचे मित्र देश सुलेमानी यांच्याकडे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पाहात होते.

इराणच्या कर्मन प्रांतात ११ मार्च १९५७ रोजी जन्मलेले कासिम सुलेमानी १९८० च्या दशकात इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स या सेनेत सामील झाले, १९८० ते १९८८ या काळात झालेल्या इराण-इराक युद्धाच्या वेळी सुलेमानी यांनी साराल्लाहच्या ४१व्या तुकडीचे नेतृत्व केले होते. इराणची पूर्वेची सीमा सांभाळण्याची जबाबदारी या तुकडीकडे होती. इराकविरोधात झालेल्या अनेक कारवायांमध्ये सुलेमानी यांचा सहभाग होता.

ऑपरेशन डॉन ८, कर्बाला ४ आणि कर्बाला ५ या ऑपरेशनमध्येही त्यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे लेबनॉन, सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये इराणने केलेल्या कारवाया सुलेमानी यांच्यामार्फत करण्यात आल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मार्च २०१९ मध्ये सुलेमानी यांना इराणने ऑर्डर ऑफ जोल्फाकार हा सर्वोच्च वीर पुरस्कार दिला होता. १९७९ नंतर हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले इराणी होते.

सीरिया आणि इराक यांच्यातील युद्धात सुलेमानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यादरम्यान मध्य पूर्वेत इराणचे वर्चस्व वाढू नये यासाठी सौदी अरेबिया आणि इस्राएल प्रयत्न करीत होते, तर दुसरीकडे अमेरिकाही इराणविरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र त्याही स्थितीत इराणचे वर्चस्व कायम ठेवण्यात सुलेमानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या तीनही देशांमधील संस्थांनी सुलेमानी यांचा काटा काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, मात्र त्यामधून ते बचावले होते.

इराकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी झालेल्या उच्चपदस्थ चर्चेत सुलेमानी यांचा थेट सहभाग होता, हे उघड झाल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. तेव्हापासून त्यांचा इराकमध्ये राबता होता.

‘इराणपोल’ आणि मेरिलॅण्ड विद्यापीठाने २०१८ मध्ये एक पाहणी अहवाल जारी केला, त्यामधून सुलेमानी यांच्या लोकप्रियतेचे प्रमाण ८३ टक्के असल्याचे स्पष्ट झाले होते. सुलेमानी यांनी याबाबतीत अध्यक्ष हसन रौहानी आणि परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरिफ यांना मागे टाकले होते.

सुलेमानी यांचे वडील शेतकरी होते आणि त्यांना शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्याकडून जमिनीचा एक तुकडा मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 3:35 am

Web Title: qasem soleimani popular and powerful general zws 70
Next Stories
1 रिपब्लिनकन पक्षाकडून कारवाईचे स्वागत, डेमोक्रॅटिक पक्षाची ट्रम्प यांच्यावर टीका
2 इराणचा अमेरिकेला सज्जड इशारा!
3 अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी ठार ; आखातात तणाव
Just Now!
X