वॉशिंग्टन : अमेरिकेने शुक्रवारी पहाटे बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईहल्ला करून इराणचे इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांना ठार मारले. त्यामुळे आखातात तणाव निर्माण झाला आहे.

चवताळलेल्या इराणने सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याचा इशारा दिल्याने आखातात युद्धजन्य तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने धोकादायक पाऊल उचलले असून त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे इराणने ठणकावले आहे.

अमेरिका – इराणमधील संबंध गेले वर्षभर तणावपूर्ण होते. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध लादून त्याची कोंडी केली होती. या दोन देशांतील तणावात शुक्रवारी पहाटे अमेरिकेने सुलेमानी यांना ठार केल्याने तेल ओतले गेले.

सुलेमानी यांचा ताफा इराकची राजधानी बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होता. त्यावर अमेरिकेने हवाईहल्ला करून इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचे कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केले. या हल्ल्यात सुलेमानी यांच्यासह अन्य आठ जण ठार झाले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरूनच हा हल्ला करण्यात आल्याचे ‘पेण्टागॉन’ने स्पष्ट केले. परदेशातील अमेरिकेचे नागरिक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सुलेमानी यांना ठार करण्याचा आदेश देण्यात आला होता, असे निवेदन ‘पेण्टागॉन’ने जारी केले आहे.

जग धोकादायक वळणावर!

पॅरिस : अमेरिकेने इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. जग ही अतिधोकादायक जागा बनली असून अशा वेळी सर्व देशांनी संयम दाखवावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनी केले आहे. चीन, रशिया आणि फ्रान्सने अमेरिकेच्या हल्ल्याबद्दल तीव्र नापंसती व्यक्त केली. तर ब्रिटन आणि जर्मनीने इराणला दोष दिला आहे.

जागतिक बाजारात चिंता..

अमेरिका-इराण संघर्षांमुळे शुक्रवारी जागतिक बाजार चिंताग्रस्त होता. आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांकही घसरले. युरोपीय भांडवली बाजाराची सुरुवात किरकोळ वाढीने झाली. देशात वरच्या टप्प्याला पोहोचलेल्या भांडवली  बाजारात नफा कमावताना गुंतवणूकदारांनी दोन्ही प्रमुख निर्देशांकांना सप्ताहअखेरीस घसरण नोंदविण्यास भाग पाडले. यामुळे गुरुवारी विक्रमी पातळी गाठणारा निफ्टी निर्देशांक आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात घसरला. भांडवली बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक गुरुवारी वरच्या टप्प्यावर होते.

निर्देशांकाने ३०० अंशांची झेप घेतली होती. तर निफ्टी प्रथम १२,३०० पर्यंत पोहोचला होता. शुक्रवारी निफ्टीत ५५.५५ अंश घसरण होऊन निर्देशांक १२,२२६.६५ वर स्थिरावला, तर १६२.०३ अंश घसरणीसह निर्देशांक ४१,४६४.६१ पर्यंत येऊन थांबला.

अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील : खामेनी

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी आक्रमक झाले असून अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. अमेरिकेला आपल्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील. सुलेमानी यांच्या रक्ताने ज्यांचे हात माखले आहेत, त्यांच्यावर सूड घेण्यात येईल. आम्ही सुलेमानी यांच्याच मार्गावर चालत राहू. या पवित्र लढाईमध्ये जय आमचाच होईल, असे खामेनी यांनी सरकारी वाहिनीवरील संदेशात म्हटले आहे.

तेल दराचा भडका

मुंबई : अमेरिका-इराणमधील नव्या संघर्षांमुळे खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती जवळपास तीन टक्क्यांपर्यंत वाढल्या. परिणामी तेलाने पुन्हा एकदा प्रति पिंप ६८चा टप्पा पार केला आहे. लंडनबरोबरच अमेरिकेच्या बाजारातील खनिज तेलाच्या किमतीही वाढू लागल्या आहेत.

रुपयात घसरण

अमेरिका-इराण युद्धाचे सावट सप्ताहअखेरीस भांडवली बाजाराप्रमाणेच परकी चलन विनिमय मंचावरही उमटले. शुक्रवारच्या एकाच व्यवहारात तब्बल ४२ पैशांची आपटी अनुभवल्यानंतर स्थानिक चलन ७१.८० पर्यंत स्थिरावले. परिणामी रुपयाने गेल्या दीड महिन्यातील किमान स्तर आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात गाठला. रुपया यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी शुक्रवारच्या समकक्ष स्तरावर होता.

‘सुलेमानीला ठार करण्याचा आदेश ट्रम्प यांचाच’

वॉशिंग्टन : कासिम सुलेमानी हा इराक आणि अन्य ठिकाणी असलेल्या अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची योजना आखत होता. सुलेमानी आणि त्याचे दल अमेरिकेतील शेकडो नागरिक त्याचबरोबर अन्य लोकांच्या मृत्यूला जबाबदार होते. त्यामुळे ट्रम्प यांनी सुलेमानीला ठार करण्याचा आदेश दिला होता, असे पेण्टागॉनने म्हटले आहे.

सुलेमानी ठार झाल्याच्या वृत्तानंतर तेलाच्या किमतींमध्ये चार टक्क्यांहून जास्त वाढ अमेरिकेच्या कारवाईमुळे मध्य-पूर्व आशियातील तणाव वाढण्याचा रशियाचा इशारा सुलेमानींना ठार केल्याने जग अधिक धोकादायक झाल्याची फ्रान्सची प्रतिक्रियातणाव वाढून परिस्थिती चिघळू नये म्हणून संयम पाळण्याचा चीनचा अमेरिकेला सल्ला

कासिम सुलेमानी याला बऱ्याच वर्षांपूर्वी नष्ट करायला हवे होते.  त्याने हजारो अमेरिकी नागरिकांची हत्या केली, तर अनेकांना मारण्याचे षडयंत्र रचले होते. अखेर तो सापडला आणि मारला गेला.

– डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका