पनामा पेपर्स प्रकरण

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी, लंडनमध्ये वादग्रस्त मालमत्ता खरेदी करण्यासाठी कतारच्या राजपुत्राने निधी उपलब्ध करून दिल्याच्या पत्रासह, आपल्या मालमत्तेबाबतचा सविस्तर तपशील मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. लंडनमधील सदर मालमत्ता आता शरीफ यांच्या मुलांच्या मालकीची आहे.

शरीफ आणि त्यांची कन्या मरियम यांनी आपल्या मालमत्तेबाबत ३९७ पानांचा सविस्तर तपशील सादर केला आहे. लंडनमध्ये सदनिका खरेदी करण्यासाठी कतारचे राजपुत्र शेख हमाद बिन जसीम बिन हमाद बिन अब्दुल्ला बिन जसीम बिन मोहम्मद अली थानी यांनी आर्थिक सहकार्य केले. त्याबाबतच्या पत्राचाही या दस्तऐवजामध्ये समावेश आहे.

शरीफ यांच्या पुत्रांचे वकील अक्रम शेख यांनी सदर पत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. शरीफ यांनी १९८० मध्ये कतारच्या राजपुत्राच्या वडिलांच्या अल थानी या कंपनीत १२ दशलक्ष दिरहॅमची गुंतवणूक केली होती, असे त्या पत्रांत म्हटले आहे. त्यानंतर २००६ मध्ये या गुंतवणुकीबाबतचे हिशोब हुसेन नवाझ शरीफ आणि अल थानी कुटुंबीयांनी पूर्ण केले. त्यानंतर थानी कुटुंबीयांनी कंपनीचे समभाग हुसेन शरीफ यांच्या प्रतिनिधींना दिले, असे पत्रांत म्हटले आहे.

हे पत्र पाहिल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या पाच न्यायाधीशांच्या पीठापैकी एका न्यायाधीशाने प्रतिप्रश्न केला. नवाझ शरीफ यांनी पार्लमेण्टमध्ये जे निवेदन केले. त्यामध्ये निधीचा स्रोत अथवा सदर निधी कतारच्या कंपनीकडून मिळाल्याचे जाहीर केले नव्हते, असे एका न्यायाधीशाने स्पष्ट केले.

तहरिक-ए-इन्साफचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान आणि अन्य काही जणांनी शरीफ आणि त्यांच्या पुत्रांची नावे पनामा पेपर्समध्ये असल्याबद्दल याचिका केली आहे. मालमत्ता वैध निधीद्वारे खरेदी करण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.