साबरी ब्रदर्स या कव्वाली ग्रुपचे सर्वेसर्वा अमजद साबरी यांची बुधवारी दुपारी कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अमजद साबरी यांच्या मोटारीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या साबरी यांना लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
अमजद साबरी आणि त्यांच्या एक सहकारी दोघेही मोटारीतून निघाले असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून लियाकताबाद भागामध्ये त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या मेंदूत घुसल्याचे पाकिस्तानातील ‘डॉन’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानात कव्वाल गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या मकबूल साबरी यांचे अमजद हे पुतणे होते.