देशातील शहरांच्या हद्दीत सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारने बुधवारी क्वाड्रिसायकल वाहनांना परवानगी दिली आहे. सध्या आपण ज्या रिक्षा वापरतो त्या सुरक्षित नसल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे. क्वाड्रिसायकल वाहने ही व्यवस्थित दरवाजे असलेली व बंदिस्त असल्याने त्यांचा वापर योग्य ठरेल असे सरकारने म्हटले आहे. पण या वाहनाची वेग मर्यादा व इंजिन क्षमता छोटय़ा मोटारीपेक्षा कमी असल्याने या गाडय़ा वापरात आणल्यास वाहतुकीचा वेग कमी होऊ शकतो.
रस्ते वाहतूक सचिव विजय छिब्बर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत क्वाड्रिसायकलचा समावेश वाहतुकीस अनुकूल वाहनांमध्ये करण्याबाबत केंद्रीय मोटर वाहन नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वाहनांची एक नवीन वर्गवारी त्यात समाविष्ट केली जाणार आहे. सध्याच्या तीन चाकी वाहनांचे नियम किंवा युरोपीय समुदायात क्वाड्रिसायकलला लागू असलेले नियम यांचा वापर यात केला जाणार आहे.
बजाज ऑटो उद्योगासाठी ही आनंदाची बातमी असून या कंपनीने गेल्या वर्षी आरइ ६० हे क्वाड्रिसायकल वाहन बाजारात आणले आहे. त्याची क्षमता २०० सीसी पेट्रोल इंजिनची असून त्याचा ताशी वेग सत्तर कि.मी असणार आहे. एका लिटरला हे वाहन ३५ कि.मी जाते. या वाहनावर क्यू हे चिन्ह दर्शवलेले असते. परवानाधारक चालक ही वाहने चालवू शकतील तसेच शहराच्या हद्दीतच त्यांचा वापर करता येईल.
क्षमता : २०० सीसी
ताशी वेग : ७० कि.मी
सरासरी : लिटरला ३५ कि.मी
मर्यादा : सीएनजीवर असणे आवश्यक, वाहतुकीचा वेग मंदावण्याची भीती.
किंमतीची तुलना : रिक्षाची किंमत अंदाजे १.३५ लाख, क्वाड्रिसायकलची किंमत :
१ ते २ लाखांच्या दरम्यान म्हणजे रिक्षापेक्षा जास्त.