बनारस हिंदू विद्यापीठातील (बीएचयू) कला शाखेच्या एम. ए. इतिहास या विषयाच्या प्रश्न पत्रिकेत आलेल्या प्रश्नांमुळे वाद निर्माण झाला आहे. इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ट्रिपल तलाक, अल्लाउद्दीन खिल्जी यावर प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

काय प्रश्न विचारण्यात आले?

इस्लाम धर्मातील हलाला म्हणजे काय?

जिल्ले अल्लाह काय आहे?

अल्लाउद्दीन खिल्जीने निर्यात केलेल्या गव्हाची किंमत काय होती?

सिकंदर-ए-सानी हे स्वतःला कोण म्हणवून घेत असे?

शर्फ कायिनी कोण होता?

हे प्रश्न विचारण्यात आल्याने इतिहासाच्या परीक्षेवरून वाद निर्माण झाला आहे. या विद्यापीठातून एका विशिष्ट धर्माचा प्रसार केला जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. तर आम्ही विचारलेल्या प्रश्न पत्रिकेतील प्रश्न मुळीच चुकीचे नाहीत अशी भूमिका जेएनयूने घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये दुही पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक असे प्रश्न इतिहासाच्या पेपरमध्ये विचारण्यात आले असा आरोप विकास या विद्यार्थ्याने केला.

जे विद्यार्थी आमच्यावर आरोप करत आहेत त्यांनी हा विषय समजूनच घेतलेला नाही. मध्ययुगीन भारताचा इतिहास हा विषय आम्ही शिकवला तेव्हा आरोप करणारे विद्यार्थी गैरहजर असतील. कारण मध्ययुगीन भारताच्या इतिहास अभ्यासक्रमात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात असे सहाय्यक प्राध्यापक राजीव श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. तसेच विद्यार्थी जे मांडत आहेत ते त्यांचे मत आहे, वास्तव नाही असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही जेव्हा इस्लामचा इतिहास शिकवतो तेव्हा या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना लक्षात येतात. संजय लीला भन्साळीसारखे लोक काही इतिहास शिकवत नाहीत, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले.