काश्मीर, सियाचेन आणि सर क्रीक खाडी हे प्रश्न पडद्यामागील राजनीतीच्या (ट्रॅक-२) मार्गानेच सोडवावे लागतील, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझीझ यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात रशियातील उफा येथे द्विपक्षीय चर्चा झाली होती. त्यातील संयुक्त निवेदनात काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानात शरीफ यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.
‘द डॉन’ या वृत्तपत्राने अझीज यांचा हवाला देऊन म्हटले आहे, की दोन्ही देशांनी काश्मीर, सर क्रीक व सियाचेन हे प्रश्न ट्रॅक २ पद्धतीने सोडवण्याचे ठरवले असून त्यात एकमेकांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
सरताज अझीज यांनी सांगितले, की दोन्ही देशांतील चर्चा चांगल्या वातावरणात झाली असून दोन्ही देशांसाठी या भागात शांतता महत्त्वाची आहे.
एकमेकांशी लढा देण्यापेक्षा दारिद्रय़ाचा सामना केला पाहिजे यावर दोन्ही देशांचे मतैक्य झाले आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणाव कमी करणे व सीमा सुरक्षा दल तसेच पाकिस्तानी रेंजर्स यांच्या प्रमुखात चर्चा घडवून आणण्याची व्यवस्था अमलात आणणे महत्त्वाचे आहे.
एकमेकांची मते जाणून घेता आल्याने सीमेवरील तणाव कमी करण्यात या चर्चेचा फायदाच होईल.