29 September 2020

News Flash

शांत, निश्चल लालू

चारा घोटाळाप्रकरणी सोमवारी, ३० ऑक्टोबरला अंतिम सुनावणी केली जाणार असल्याचे सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १७ सप्टेंबरलाच जाहीर केले होते.

| October 1, 2013 12:33 pm

चारा घोटाळाप्रकरणी सोमवारी, ३० ऑक्टोबरला अंतिम सुनावणी केली जाणार असल्याचे सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १७ सप्टेंबरलाच जाहीर केले होते. त्यामुळे या सुनावणीला लालू स्वत: उपस्थित होते. सुनावणीपूर्वी न्यायालयाबाहेर जमलेल्या समर्थकांना लालूंनी अभिवादन केले. पांढराशुभ्र कुर्ता-पायजमा या नेहमीच्याच वेशात असलेले लालू शांत दिसत होते. निकालानंतरही कोणतीही प्रतिक्रिया न नोंदवता थेट तुरुंगाच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत जाणेच त्यांनी पसंत केले.
चारा घोटाळय़ात लालूंशिवाय इतर ४४ जणांना दोषी ठरवण्यात आले असून, त्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र, इतर सहा राजकीय नेते व चार आयएएस अधिकारी आदींचा समावेश आहे. न्यायमूर्ती प्रवासकुमार सिंग यांनी चाईबासा कोषागारातील ३७.७ कोटी रुपयांच्या घोटाळय़ात त्यांना दोषी ठरवले आहे. सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर लालूप्रसाद यांना रांचीजवळच्या होटवार येथील बिरसा मुंडा तुरुंगात नेण्यात आले. न्यायालयातून बाहेर पडले तेव्हाही ते शांत होते. त्यांनी कुणाच्याच प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत.
४५ आरोपी दोषी
 सर्व ४५ आरोपींना भादंवि कलम १२० बी (गुन्हेगारी कट), ४२० (फसवणूक), ४६७  (महत्त्वाची कागदपत्रे बनावट तयार करणे, पैसे स्वीकारणे), ४६८ (फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रे करणे),भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे. त्यात महेश प्रसाद, फूलचंद सिंग, बेक ज्युलियस, के. अरुमुगम, प्राप्तिकर अधिकारी ए. सी. चौधरी, माजी पशुसंवर्धन अधिकारी व चारा पुरवठादार हे आरोपी आहेत. नंतर न्यायालयाने माजी आयएएस व पशुसंवर्धन अधिकारी अरुमुगम, कामगारमंत्री विद्यासागर निशाद, माजी आमदार ध्रुव भगत व पाच चारा पुरवठादारांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
लालूंचा उदयास्त..
जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून प्रेरित झालेल्या लालूंनी अवघ्या २९व्या वर्षी खासदारकी पटकावली. १९७७ मध्ये त्यांनी दिल्ली गाठून सर्वात तरुण खासदार होण्याचा मानही लालूंनी पटकावला. राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि कायद्यातील पदवीधर असलेल्या लालूंचे राजकारण म्हणजे ग्रामीण ढंग आणि इरसालबाजीचा अस्सल नमुनाच. तब्बल दहा वष्रे त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले. त्यांच्या कारकिर्दीत बिहारमध्ये टोळीयुद्ध, लुटालूट, जातीपातीचे राजकारण, भ्रष्टाचार, अनागोंदी आदी प्रकारांनी कळस गाठला होता. त्यांच्या कारकिर्दीला म्हणूनच ‘जंगलराज’ संबोधले जात असे. मात्र, या सर्वाचा लालूंच्या लोकप्रियतेवर काडीचाही परिणाम झाला नाही. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होऊन तुरुंगात जाऊनही लालू बिहारी जनतेच्या गळ्यातील ताईतच बनून राहिले. त्याचे प्रत्यंतर २०००च्या विधानसभा निवडणुकीत आले. १५ वष्रे त्यांनी बिहारवर राज्य केले. २००५ पर्यंत राबडीदेवींच्या माध्यमातून लालूंनीच बिहारचे राज्यशकट हाकले. मात्र, त्यानंतर त्यांची लोकप्रियता घटत गेली. २००५च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी लालूंना नाकारले. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कारकिर्दीत लालूंनी केंद्रात रेल्वेमंत्रिपद भूषवले. २००४ ते २००९ या कालावधीत त्यांनी तोटय़ात गेलेल्या रेल्वेला फायद्यात आणले. त्यांच्या या यशाचे गमक जाणून घेण्यासाठी लालूंना हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यानालाही बोलावण्यात आले होते. २०१०मध्ये बिहारमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने लालूंनी जोर लावला. यावेळी मात्र मतदारांनी त्यांना पुन्हा नाकारले. राष्ट्रीय जनता दलाला अवघ्या २२ जागांवरच विजय मिळवता आला तर लोकसभा निवडणुकीत अवघे चारच खासदार निवडून आले. त्यामुळे दिल्लीतील लालूंचे वजन कमालीचे घटले. अलीकडच्या काळात दिल्ली व बिहारमध्ये त्यांचा दबदबा राहिलाच नसल्याचे दिसून येत होते.
राजदची सूत्रे राबडीदेवींकडे
पाटणा : कोटय़वधी रुपयांच्या चारा घोटाळाप्रकरणी दोषी ठरल्यामुळे लालूप्रसाद यादव यांची रवानगी तुरुंगात झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्षच तुरुंगात गेल्यानंतर पक्षाची धुरा बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आपल्या हाती घेणार आहेत. ‘ज्याप्रमाणे काँग्रेसची सूत्रे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या हाती आहेत, त्याचप्रमाणे आपणही मुलाच्या मदतीने राजदची धुरा वाहू,’ असा विश्वास राबडी यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 12:33 pm

Web Title: quiet calm lalu sent to ranchi jail
टॅग Lalu Prasad Yadav
Next Stories
1 लालूंविरोधात कट केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
2 देशाला वास्तववादी पंतप्रधानांची गरज – राजनाथ सिंग
3 निरपराध मुस्लीम युवकांना स्थानबद्ध करू नका
Just Now!
X