काल (सोमवार) झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी दिलेल्या विशेष खोलीच्या वादावरून गोंधळ झाला. अधिवेशनापूर्वी, विरोधी भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ पायऱ्यांवर बसून ‘हनुमान चालीसा’ आणि ‘हरे राम’ चे पठण करत आंदोलन केले. तसेच कार्यवाही दरम्यान सभागृहाच्या वेलमध्ये जात जय श्रीराम म्हणत घोषणा दिल्या. त्यामुळे गदारोळ निर्माण झाला होता. या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलनादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी रविवारी मुख्यमंत्री सोरेन आणि सभापतींचे पुतळे देखील जाळले होते.

काल सभागृहात गोंधळ सुरूच राहिल्याने सभापतींनी सभागृह दुपारी १२.४५ पर्यंत तहकूब केले होते. दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी देखील सभागृहात गोंधळ सुरु आहे. आज कामकाज सुरू झालं तेव्हा भाजपा आमदारांनी जय श्री राम, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर सभापती रवींद्रनाथ महतो यांनी विरोध करणाऱ्या आमदारांना विनंती केली की, “हा माझ्या पदाचा अपमान आहे,हे सहन केल्या जाणार नाही. जर तुम्हाला राग आला असेल तर मला मारहाण करा, पण कामकाजात अडथळा आणू नका. कृपया तुमच्या ठिकाणी जा. मला खूप अडचण होत आहे. कालही तुम्ही खूप वाईट वागलात. हा ३५ कोटी लोकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे आणि तुमच्या कृत्यांनी मी खूप दुखावलो आहे.”

हेही वाचा – विधानभवनात नमाजासाठी विशेष खोली; झारखंडमध्ये गदारोळ

आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपाच्या आमदारांनी सभागृहाच्या बाहेर सराकरच्या निर्णयाचा निषेध केला. देवघरचे आमदार नारायण दास देखील हातात कमंडल घेऊन एका पायावर नृत्य करत विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी दिलेल्या विशेष खोलीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. यावेळी भाजपा आमदारांनी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता द्यावा, ५००००० युवकांना नोकऱ्या द्याव्यात,  मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण द्यावे, अशा मागण्या केल्या आहे.

सभापतींनी नमाज अदा करण्यासाठी खोली क्रमांकाची विशेष खोली (TW ३४८) दिली आहे. त्यामुळे भाजपाने याला जोरदार विरोध केला आहे. तसेच भाजपाने विधानसभा परिसरात हनुमान मंदिर आणि इतर धर्मांची प्रार्थनास्थळे बांधण्याची मागणी देखील केली आहे.  विधानभवनात नमाजासाठी खोली देणे असंवैधानिक असल्याचे भाजपाने म्हटले आहे.