त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु ठेवली असून, पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटीशांना विरोध दर्शवण्यासाठी आपला नोबेल पुरस्कार परत केला होता असं वक्तव्य बिप्लब देब यांनी केलं आहे. बिप्लब देब यांचा वक्तव्य केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयपूर येथे रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

रवींद्रनाथ टागोर यांना ४ नोव्हेंबर १९१३ रोजी नोबेल पुरस्कार गीतांजली या रचनेसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने “सर” ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.

बिप्लब देब यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेमुळे भाजपाच्या अडचणी वाढत आहेत. गेल्याच महिन्यात त्यांनी महाभारताच्या काळापासून इंटरनेट आणि सॅटेलाइट सेवा उपलब्ध असल्याचा जावईशोध लावला होता. आपल्या या वक्तव्यावर त्यांनी कोणतं स्पष्टीकरणही दिलं नव्हतं.

यानंतर त्यांनी मिस वर्ल्ड डायना हेडनचाही अपमान केला होता. सौंदर्य स्पर्धा बोगस असून, २१ वर्षांपूर्वी डायना हेडन विश्वसुंदरी झालीच कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. अभिनेत्री ऐश्वर्या राय ही खऱ्या अर्थानं भारतीय महिलांचं प्रतिनिधीत्व करते. आम्ही महिलांना लक्ष्मी, सरस्वतीप्रमाणं देवी मानतो. ती विश्वसुंदरी झाली. पण डायना हेडन विश्वसुंदरी झालीच कशी असा सवाल त्यांनी विचारला होता. ज्यानंतर त्यांना माफीही मागावी लागली.

याशिवाय नागरी सेवा क्षेत्रासाठी मेकॅनिकल इंजिनियरपेक्षा सिव्हिल इंजिनियर जास्त योग्य आहेत. जे प्रशासनात आहेत त्यांना समाज बांधायचा असतो. सिव्हिल इंजिनियर्सना याचे उत्तम ज्ञान असते. त्यामुळे ज्यांची मेकॅनिकल इंजिनियरींगची पार्श्वभूमी आहे त्यांनी नागरी सेवा क्षेत्रात जाऊ नये असे अजब विधान बिप्लब देब यांनी केले होते.

काही आठवड्यांपूर्वी बोलताना, पदवीधरांना सरकारी नोकऱ्यांच्या मागे न धावत त्याऐवजी पानाची टपरी सुरु करावी असा अजब सल्ला त्यांनी दिला होता.