बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविषयी बोलताना बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची जीभ आज, मंगळवारी घसरली. सद्यस्थितीत नितीशकुमार आणि भाजपची जवळीक वाढत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. सुशीलकुमार मोदी यांनी त्यांच्या बहिणीचे नितीशकुमार यांच्याशी लावून द्यावे, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर लगेच त्यांनी सारवासारव केली. थोडी मस्करी केली तर, काय झाले, अशा त्या म्हणाल्या.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अनेकदा केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाची स्तुती केली आहे. त्यामुळे नितीशकुमार आणि भाजपमध्ये जवळीक वाढत आहे, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. बिहारमधील भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनीही नितीशकुमारांबाबत बोलताना त्यांनी महाआघाडीवर पुनर्विचार करावा, असा सल्ला दिला होता. याबाबत राबडीदेवी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. पण त्याचे उत्तर देताना राबडीदेवी यांची जीभ घसरली. नितीशकुमार यांनी आमच्या सोबत यावे, असा आग्रह सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे, असे पत्रकाराने विचारले. त्यावर राबडीदेवी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. मोदीजी, तुम्ही नितीशकुमार यांना कडेवर घ्यावे. तुमच्या बहिणीसोबत त्यांचे लग्न लावून द्यावे, असे त्या म्हणाल्या. या वक्तव्यानंतर लगेच त्यांनी स्वतःला सावरले. त्यात वादग्रस्त असे काय आहे. थोडी मस्करी केली तर त्यात काय झाले? असे तर सर्वच करतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

दरम्यान, भाजपशी जवळीक वाढत असल्याच्या चर्चेला नितीशकुमार यांनी काल पक्षाच्या झालेल्या बैठकीत पूर्णविराम दिला आहे. काही लोक राजकीय बळी देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. राज्यात महाआघाडीच्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे, असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.