लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन मुलायमसिंह यादव यांनी मोदीविरोधकांना बुचकळ्यात टाकलं आहे. मुलायमसिंह यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबरी देवी यांनीही मुलायमसिंह यादव यांच्यावर टीका केली असून त्यांचं वय झालं असल्याचं म्हटलं आहे.

‘मुलायम सिंह यांचं वय झालं आहे. कधी काय बोलायचं हे त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ नाही’, असं राबडी देवी यांनी म्हटलं आहे. मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत असे विधान करुन मुलायम सिंह यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदी पुन्हा पंतप्रधान बनले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे असे मुलायम सिंह आपल्या भाषणात म्हणाले. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या महाआघाडीने भाजपाविरोधात एल्गार पुकारला असतानाच समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी मोदींचे कौतुक केले.

मुलायमसिंह यादव मोदींचे कौतुक करत असताना त्यांच्या शेजारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या देखील बसल्या होत्या. या सभागृहात उपस्थित असलेले सर्व सदस्य निवडून यावे, अशी प्रार्थना मी करतो. सध्या आमची (विरोधी बाकांवरील खासदारांची) संख्या कमी आहे. आणि तुम्हीच पुन्हा पंतप्रधान व्हावे, असे त्यांनी मोदींना सांगितले. यावर सभागृहातील खासदारांना हसू आवरता आले नाही. मोदींनीही हात जोडून यादव यांचे आभार मानले.

मुलायम सिंह यादव यांनी मोदींची स्तुती केली त्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे कौतुक केले आहे. खरी परिस्थिती काय आहे ते मुलायम सिंह यादव यांना ठाऊक आहे, म्हणून त्यांनी मोदींचे कौतुक केले असे योगी म्हणाले. १६ व्या लोकसभेच्या अखेरच्या सत्रात मुलायम जे बोलले तोच देशाचा मूड आहे असे योगींनी सांगितले.

योगी आदित्यनाथांनी ही संधी साधत मुलायम सिंहाचे सुपूत्र आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. मुलायम सिंह यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलाला जमिनीवरची परिस्थिती समजली तर खूप चांगले होईल असे योगी म्हणाले. अखिलेश यांना लखनऊ विमानतळावर रोखले म्हणून मुलायम यांनी कौतुक केल्याची शक्यता योगींनी फेटाळून लावली.

अनेक विरोधकांच्या मागे लागलेल्या विविध प्रकरणांच्या चौकशीच्या फेऱ्यांच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारप्रकरणी आपल्यावरही ही वेळ येऊ नये यासाठीच मुलायम सिंह यादव यांनी मोदींची प्रशंसा केली, असे मत राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांनी व्यक्त केले आहे.

अमर सिंह म्हणाले, मुलायमसिंह यांनी मनापासून हे विधान केले की नाही, याचा विचार होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या विधानाने गोंधळ निर्माण केला आहे. मला वाटतं की, ज्या चंद्रकला आणि रामा रामन यांनी मुलायम सिंह यादव आणि मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली नोयडा शहर लुटले, या भ्रष्टाचारातून बचावासाठी मुलायम सिंह यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. आपल्या मागे सीबीआय किंवा ईडीच्या चौकशीचा फेरा लागू नये, त्यामुळे मोदींची प्रशंसा केल्याने किमान ते तटस्थ तरी राहतील अस त्यांना वाटलं असेल, त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, समाजवादीने आझम खान यांनीही मुलायम सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मुलायम यांच्या वक्तव्याने मला खुपच दुःख झाले. हे विधान त्यांच्या तोंडी टाकण्यात आले आहे. हे विधान मुलायम सिंह यांचे नाही तर नेताजींना ते देणे भाग पाडले आहे.