प्रसिद्ध व्यावसायिक कार रेसर असणाऱ्या अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदिता यांचा शनिवारी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात मृत्यू झाला. चेन्नईच्या संतहोम हाय रोडवर हा भीषण अपघात घडला. अश्विन यांची बीएमडब्ल्यू कार रस्त्यावरील झाडावर जाऊन आदळली आणि त्यांच्या गाडीने पेट घेतला. या आगीत होरपळून अश्विन आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीला आग लागल्यानंतर अश्विन आणि त्यांची पत्नी आग लागल्यानंतर कारमधून बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर कार झाड आणि भितींच्यामध्ये अडकून पडली. यावेळी सुंदर गाडी चालवत होते.

या रस्त्यावरून जात असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने चेन्नई नियंत्रण कक्षाला फोन करून याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी गाडीला लागलेली आग विझवली. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या पथकाने गाडीच्या काचा फोडून या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतदेह इतके खराब अवस्थेत होते की, पोलिसांना लगेच अश्विन सुंदरला ओळखता आले नाही.  गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरुन पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. पोरुर जवळच्या अल्पाक्कम येथे अश्विन आणि त्याची पत्नी राहत होते. एमआरसी नगर येथे राहणा-या मित्राच्या घरी ते गेले होते. तिथून परतत असताना ही दुर्देवी घटना घडली.