हैदराबादमधील राचकोंडा पोलीस ठाण्यात बुधवारी एक वेगळं चित्र पहायला मिळालं. सहा वर्षांचा इशान पोलीस आयुक्तांच्या वेशात खाकी वर्दीत पोलीस ठाण्यात अवतरला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत असलेल्या इशानची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला एका दिवसासाठी पोलीस आयुक्त करण्यात आलं होतं. पोलिसांनी इशानला सॅल्यूट ठोकत स्वागत केलं. विशेष म्हणजे इशाननेदेखील ही भूमिका अत्यंत गंभीरपणे घेत, शहर महिलांसाठी सुरक्षित राहावं याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं.

इशान मेडक जिल्ह्यातील कुंचनपल्लीचा रहिवासी आहे. इशानला कॅन्सर झाला आहे. इशानला पोलीस आयुक्त होण्याची इच्छा होती. ‘मेक अ विश फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने इशानची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने राचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्याशी संपर्क साधला.

‘शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. गंभीर आजाराशी तो झुंज देत आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा आणि पोलीस खात्यात भरती व्हावा अशी इच्छा. आम्ही त्याचा आजार बरा करु शकत नाही, पण त्याचं स्वप्न, इच्छा नक्की पूर्ण करु शकतो’, असं भागवत यांनी म्हटलं आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांनी इशानला तू पोलीस आयुक्त झाल्यावर सर्वात आधी कोणतं काम करशील ? असं विचारला असता त्याने सांगितलं की, मी शहरात सीसीटीव्ही बसवेन आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. विशेष म्हणजे यावेळी इशान बोलताना घाबरेल असं अनेकांना वाटत होतं. पण इशानने न घाबरता सर्वांशी संवाद साधला. मी चोरांना जेलमध्ये टाकणार असं म्हणताच महेश भागवत यांनाही हसू अनावर झालं. यावेळी भागवत यांनी इशानच्या उपचारासाठी १० हजारांचा चेकही दिला.