इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वैद्यकीय साहित्याच्या सामानातून किरणोत्सर्जक पदार्थाची गळती झाल्याचा संशय आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या भागात सुरक्षा कडे केले. अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी गेले.  दरम्यान बीएआरसी व एनडीआरएफच्या पथकांनी सदर सामान उघडून तपासणी केली असता त्यात कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले. जे घडले त्याला किरणोत्सर्गी पदार्थाची गळती म्हणता येणार नाही कारण ते ठराविक मर्यादेत आहे असे सांगण्यात आले. हा भाग प्रवासी भागापासून दीड किमी अंतरावर असून तो रिकामा करण्यात आला आहे व तेथे सुरक्षा कडे करण्यात आले आहे.

 

अफगाणिस्तानात हेलिकॉप्टर कोसळून ८ सैनिक ठार

काबूल : अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बाघलान प्रांतात सैन्याचे एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ८ अफगाणी सैनिक ठार झाले. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात हेलिकॉप्टरमधील ५ कर्मचारी आणि लष्कराचे तीन जवान ठार झाल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते दावलात वझिरी यांनी सांगितले.

एका लष्करी तळाकडे आवश्यक सामान घेऊन जाणारे हे हेलिकॉप्टर दांड घोरी जिल्ह्य़ात कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगून दहशतवाद्यांनी हे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. एक हेलिकॉप्टर मैदानावर होते, तर दुसरे वर आकाशात गस्त घालत होते. या वेळी अचानक तांत्रिक बिघाड उद्भवल्यामुळे त्याला आग लागली व ते जमिनीवर कोसळले, असे वझिरी म्हणाले.

मात्र हेलिकॉप्टर तालिबानच्या दहशतवाद्यांनी पाडल्याचा दावा करणारे निवेदन संघटनेचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने जारी केले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर लष्करी तळाला अन्न, पाणी व शस्त्रांचा पुरवठा करत असताना दहशतवाद्यांनी ते पाडल्याचे बाघलानमधील दोन प्रांतिक अधिकाऱ्यांनीही सांगितले. करघान तापा तळाला दहशतवाद्यांनी एका आठवडय़ापासून वेढा घातला होता आणि शंभराहून अधिक सैनिक आत अडकून पडले होते, असे अधिकाऱ्यांनी माहिती देताना म्हटले आहे.