राफेल डीलवरुन सध्या देशात काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे जोरदार राजकारण रंगले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ३० ऑगस्टला केलेले टि्वट त्यानंतर फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी राफेल डिल संबंधी केलेला खुलासा या दोन्ही घटनांमध्ये सुसूत्रता दिसून येते. ३० ऑगस्टला राहुल गांधी पॅरिसमध्ये काही बॉम्ब फुटणार आहेत असे टि्वट केले होते. त्यानंतर ओलांद यांनी हा खुलासा केला. ही जी जुगलबंदी आहे त्याचे माझ्याकडे कुठलेही पुरावे नाहीत पण मनात संशय निर्माण होतो असे जेटली म्हणाले.

हे सर्व ठरवून योजनाबद्ध पद्धतीने केले असेल तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही ? असे जेटली म्हणाले. तुम्ही जनतेमध्ये बोलता तेव्हा तो लाफ्टर शो नसतो. कधीही कोणाला मिठी मारा, डोळे मारा, त्यानंतर दहा वेळा चुकीचे बोला असे चालत नाही. लोकशाहीत टीका होते पण शब्द असे वापरताना त्यात बुद्धी दिसली पाहिजे असे जेटली म्हणाले. राफेल डीलवरुन शनिवारी राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर जेटलींना शब्द जपून वापरण्यात सल्ला दिला.

राफेल फायटर विमानांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप अरुण जेटलींनी फेटाळून लावला. विमान जास्त किंमतीला विकत घेतली असतील किंवा कमी किंमतीला तो कॅगच्या तपासाचा विषय आहे असे जेटली म्हणाले. कितीही आरोप झाले तरी राफेल डील रद्द होणार नाही. राफेल एक पारदर्शक खरेदी व्यवहार असून तो रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही असे जेटली म्हणाले.

५८ हजार कोटींच्या राफेल खरेदी करारात भारत सरकारने डसॉल्ट एव्हिशन बरोबर भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सची शिफारस केली होती. त्यामुळे आमच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता असे ओलांद यांनी सांगितल्याने भारतीय राजकारणात वादळ निर्माण झाले आहे.

ओलांद यांनी फ्रान्समधील एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारत सरकारने आमच्याकडे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीशी व्यवहार करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आमच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता.