राफेल विमाने खरेदी व्यवहारात कसलाही ‘घोटाळा’ झालेला नसल्याची ग्वाही या विमानांची उत्पादक कंपनी असलेल्या दसॉल्त अ‍ॅव्हिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. भारतीय वायुदलासाठी ज्या ११० विमानांसाठी सरकारने प्राथमिक निविदा जारी केली आहे, त्या विमानांसाठीही आपण शर्यतीत असल्याचे या कंपनीने सांगितले.

राफेल व्यवहारात काहीही घोटाळा नाही. आम्ही ३६ विमाने देणार आहोत. भारत सरकारला आणखी विमाने हवी असतील, तर ती देणे आम्हाला आवडेल. आणखी ११० विमानांसाठी प्राथमिक निविदा जारी झाली असून, राफेल हे सर्वोत्तम विमान असल्याचे आम्हाला वाटत असल्याने आम्ही या शर्यतीत आहोत, असे दसॉल्त अ‍ॅव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी पत्रकारांना सांगितले.

संरक्षण साहित्य तयार करण्याचा अनुभव नसलेल्या रिलायन्स डिफेन्सला तुम्ही भागीदार का बनवलेत असे विचारले असता ट्रॅपियर म्हणाले की, आम्हाला अनुभव आहे आणि तो आम्ही भारतीय चमूला देणार आहोत.