फ्रेंच बनावटीची ५ बहुउद्देशीय राफेल लढाऊ विमाने गुरुवारी एका नेत्रदीपक समारंभात भारताच्या हवाई दलात सामील करण्यात आली. चीनसोबत सध्या सीमेवर तणाव वाढत असताना यामुळे देशाच्या हवाई क्षमतेत मोठी भर पडणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रसंगाचा उपयोग पूर्व लडाखमधील सीमा तंटय़ाबाबत चीनला संदेश देण्यासाठी केला. सीमेवर निर्माण केले जात असलेले वातावरण लक्षात घेता राफेल विमानांचा हवाई दलातील समावेश महत्त्वाचा असून, भारताच्या सार्वभौमत्वाकडे वाकडय़ा नजरेने पाहणाऱ्यांसाठी हा ‘मोठा’ संदेश असल्याचे ते म्हणाले. राफेल हे जगभरातील सवोत्कृष्ट लढाऊ विमानांमपैकी एक मानले जात असून, त्यांच्या खरेदीचा व्यवहार देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे चित्र बदलणारा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

पारंपरिक ‘सर्वधर्म पूजा’, राफेलच्या ताफ्याला पाण्याच्या तोफांची (वॉटर कॅनन) पारंपरिक सलामी आणि या विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरती यांनी अंबाला हवाई तळावरील ‘गोल्डन अ‍ॅरो’ स्क्वाड्रनमध्ये राफेल विमानांचा सहभाग सोहळा साजरा झाला.

बदलत्या काळानुसार आम्हाला स्वत:ला तयार करावे लागेल याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. आमची राष्ट्रीय सुरक्षा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठा प्राधान्याचा विषय असल्याचे सांगताना मला अभिमान वाटतो, असेही सिंग यांनी नमूद केले.

दोन तास चाललेल्या या समारंभात राजनाथ सिंह यांच्याव्यतिरिक्त फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली, संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया  आणि राफेल व्यवहाराशी संबंध असलेले फ्रान्समधील मोठय़ा संरक्षणविषयक कंपन्यांचे उच्चपदस्थ प्रतिनिधी उपस्थित होते.

सध्याची सुरक्षाविषयक परिस्थिती लक्षात घेता राफेल विमाने हवाई दलात सामील होण्यासाठी याहून अधिक योग्य वेळ असू शकत नव्हती, असे मत भदौरिया यांनी व्यक्त केले. गोल्डन अ‍ॅरोज स्क्वाड्रनने यापूर्वीच हे विमान उडवले असून, इतर लढाऊ ताफ्यांसोबत सघन प्रशिक्षण पूर्ण केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

फ्रान्सच्या जागतिक लष्करी पुरवठा साखळीद्वारे भारताच्या संरक्षण उद्योगाचे एकात्मीकरण करण्यास फ्रान्स पूर्णपणे बांधील असल्याचे पार्ली यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. राफेलचा भारतीय हवाई दलात समावेश हा द्विपक्षीय संरक्षण संबंधांमधील नवा अध्याय असल्याचे वर्णन त्यांनी केले. या लढाऊ विमानांच्या सहभागामुळे भारत आपल्या लोकांचे संरक्षण करण्याबाबत या संपूर्ण क्षेत्रात इतरांपेक्षा आघाडीवर राहील असेही त्या म्हणाल्या.

याप्रसंगी स्वदेशनिर्मित तेजस लढाऊ विमानांचा ताफा आणि सारंग हेलिकॉप्टर हवाई कसरती चमू यांनीही हवाई कौशल्याचे प्रदर्शन केले. या समारंभात सहभागी झालेल्या फ्रेंच शिष्टमंडळात फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनाइन, फ्रान्सच्या वायुसेनेचे उपप्रमुख एअर जनरल एरिक ऑटेलेट, दसॉल्त अ‍ॅव्हिएशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर आणि क्षेपणास्त्र उत्पादक कंपनी एमबीडीएचे सीईओ एरिक बेरांजर यांचा समावेश होता.

आतापर्यंत भारताला १० राफेल विमानांचा पुरवठा करण्यात आला असून, त्यापैकी ५ विमाने हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी फ्रान्समध्ये ठेवण्यात आली आहेत. सर्व ३६ विमाने २०२१ अखेपर्यंत दिली जातील असे ठरले आहे. ५ राफेल विमानांची दुसरी तुकडी नोव्हेंबपर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे. ३६ राफेलपैकी ३० लढाऊ विमाने, तर ६ प्रशिक्षक विमाने असतील. दोन आसनी प्रशिक्षक विमानांमध्ये लढाऊ विमानांची जवळजवळ सर्व वैशिष्टय़े असतील.

रशियाकडून सुखोई विमाने विकत घेण्यात आल्यानंतर, गेल्या २३ वर्षांत राफेल विमाने ही भारताची लढाऊ विमानांची पहिली मोठी खरेदी आहे. या विमानांची पहिली तुकडी अंबाला हवाई तळावर, तर दुसरी पश्चिम बंगालमधील हासिमारा तळावर ठेवली जाणार आहे.