भारतीय हवाई दलाची राफेल आणि सुखोई लढाऊ विमाने ही तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानसाठीच नव्हे तर इतर कुठल्याही देशांसाठी डोकेदुखी ठरतील असे, हवाई दलाचे एअर मार्शल राकेशकुमार सिंह भदोरिया यांनी म्हटले आहे.

एअर मार्शल भदोरिया यांनी फ्रान्समधील पॅरिसमध्ये राफेल विमानांतून आकाशात भरारी घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘भारतात येणारी राफेल लढाऊ विमाने आपल्या संरक्षणविषयक रणनीतीसाठी खूपच महत्वाची ठरणार आहेत. एकदा का ही विमाने हवाई दलाच्या सेवेत दाखल झाली की राफेल आणि सुखोई यांची जोडी शत्रूसाठी खतरनाक ठरतील.’

भदोरिया पुढे म्हणाले, राफेलमधून उड्डाण करणे हा खूपच सुखद अनुभव होता. याद्वारे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. या अनुभवानंतर आम्ही हे तपासणार आहोत की, आपल्या लढाऊ विमानांच्या ताफ्यातील सुखोई-३० सोबत राफेल किती फायदेशीर ठरेल. एकदा का ही दोन्ही विमाने एकाच वेळी काम करण्यास सज्ज झाली की, पाकिस्तान पुन्हा २७ फेब्रुवारीसारखी हिम्मत करणार नाही. ही दोन्ही विमाने मिळून पाकिस्तानचे मोठे नुकसान करु शकतात.

राफेलमध्ये ज्या प्रकारे तंत्रज्ञान आणि शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. हे भारतासाठी एक गेम चेंजर ठरणारे आहे. आपण ज्या प्रकारे आक्रमक कारवाया आणि पुढील काळातील युद्ध सज्जतेसाठी तयारी करीत आहोत, त्या हिशोबानं राफेलमधील तंत्रज्ञान आणि शस्त्रे अत्यंत उपयुक्त ठरणारी आहेत, असेही एअर मार्शल भदोरिया त्यांनी यावेळी सांगितले.