राफेल विमानाच्या खरेदीत भाजपा आणि नरेंद्र मोदींनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप पुन्हा एकदा काँग्रेसने केला आहे. मोदी सरकारने देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत राफेल विमानाच्या खरेदीत मोठा घोटाळा केला आहे. जर हा घोटाळा नाही सगळा व्यवहार पारदर्शी झाला आहे तर या करारासाठी भारत सरकारने किती पैसे मोजले हे उघड का केले जात नाही?  असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

काँग्रेसने दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी हा आरोप करण्यात आला आहे. गुलाम नबी आझाद यांनी असे म्हटले आहे की इतर देशांच्या तुलनेत राफेल विमाने आपल्या देशाला महाग किंमतीत मिळाली आहेत. भारताला इजिप्त आणि कतार या दोन देशांच्या तुलनेत राफेल विमानांची खरेदी महाग पडली आहे असेही काँग्रेसने म्हटले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या कराराची किंमत जाहीर करणार असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी ते पाळले नाही. यूपीएच्या काळात या कराराची किंमत जेवढी होती त्यापेक्षा जास्त किंमतीत हा व्यवहार झाला असा आरोप आझाद यांनी केला.

याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये जाऊन राफेल करार बदलल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षातील इतर नेत्यांनीही असेच आरोप केले. आता शुक्रवारी पुन्हा एकदा राफेल करारात मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.